सावरकर जयंतीनिमित्त जातिभेदाला तिलांजली देण्याचा संकल्प करा, राज्यपालांचे आवाहन
By मनोहर कुंभेजकर | Published: May 29, 2023 07:46 AM2023-05-29T07:46:01+5:302023-05-29T07:50:20+5:30
भावी पिढ्यांना सावरकरांचे योगदान कळावे यासाठी सावरकरांवर स्थायी प्रदर्शन करावे तसेच नाशिक जवळ असलेल्या भगूर या सावरकरांच्या जन्मगावी त्यांचे स्मारक उभारले जावे अशी सूचना राज्यपालांनी यावेळी केली.
मुंबई - स्वातंत्र्यवीर सावरकर हे थोर समाजसुधारक होते. सावरकरांनी जातिभेदाला तीव्र विरोध केला. अस्पृश्यता हा देशावरील कलंक आहे असे ते म्हणत, असे सांगून स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती निमित्त जातिवादाला तिलांजली देण्याचा संकल्प करण्याचे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी काल सायंकाळी बोरीवलीत केले.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १४० व्या जयंतीनिमित्त उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांच्या संकल्पनेतून बोरिवलीच्या स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यानात सावरकरांच्या जीवनकार्यावर आधारित दोन दिवसीय स्वातंत्र्यवीर सावरकर जीवनावली प्रदर्शनाचे उद्घाटन राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. आज रात्री या प्रदर्शनाची सांगता होणार आहे.
खासदार गोपाल शेट्टी यांच्या पुढाकाराने आयोजित प्रदर्शनाच्या उदघाटन सोहळ्याला उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक, स्थानिक आमदार सुनील राणे, आमदार योगेश सागर, आमदार अतुल भातखळकर,आमदार मनिषा चौधरी,माजी आमदार हेमेंद्र मेहता,स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यानाचे अध्यक्ष नितीन प्रधान, पोयसर जिमखान्याचे अध्यक्ष मुकेश भंडारी, डॉ योगेश दुबे,उत्तर मुंबई भाजप जिल्हाअध्यक्ष गणेश खणकर,भाजप प्रदेश प्रवक्ते विनोद शेलार,अजयराज पुरोहित, व मोठ्या संख्येने सावरकर वप्रेमी नागरिक उपस्थित होते.
वीर सावरकर भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणी क्रांतिकारक होते. देशाच्या पहिल्या स्वातंत्र्य लढ्यात ब्रिटिशांनी केलेल्या अत्याचाराच्या इतिहासाने प्रक्षुब्ध होऊन त्यांनी बंधू गणेश सावरकर यांच्या मदतीने देशाच्या स्वातंत्र्य प्राप्तीसाठी अभिनव भारत आंदोलन सुरु केले, असे राज्यपालांनी सांगितले. सावरकर उत्तम वक्ते, लेखक व इतिहासकार होते. अंदमानच्या सेल्युलर जेल मध्ये अत्यंत शारीरिक हालअपेष्टा सहन करून देखील त्यांचे धैर्य डगमगले नाही, असे त्यांनी सांगितले.
स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतीकारकांना कमी लेखले गेले याबद्दल खेद व्यक्त करुन क्रांतिकारकांवरील ऐतिहासिक अन्याय दूर करून त्यांचा योग्य सन्मान केला पाहिजे असे राज्यपालांनी आवर्जून सांगितले.
भावी पिढ्यांना सावरकरांचे योगदान कळावे यासाठी सावरकरांवर स्थायी प्रदर्शन करावे तसेच नाशिक जवळ असलेल्या भगूर या सावरकरांच्या जन्मगावी त्यांचे स्मारक उभारले जावे अशी सूचना राज्यपालांनी यावेळी केली.
सुरुवातीला राज्यपालांनी सावरकर यांच्या जीवनावरील प्रदर्शनाला भेट दिली. राज्यपालांच्या हस्ते डॉ परेश नवलकर, बासरी वादक पं. रूपक कुलकर्णी, सुधा वाघ आणि इतर मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
राम नाईक आपल्या भाषणात म्हणाले की,17 वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजराथचे मुख्यमंत्री असतांना त्यांनी
येथील उद्यानाला भेट दिली होती ही आठवण त्यांनी सांगितली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या नऊ वर्षाच्या कारकीर्दीत त्यांनी देशासाठी खूप काम केले.त्यांच्या मार्गावर सर्वांनी पुढे चालणे ही काळाची गरज आहे.राजकारणात अस्पृश्यता आली आहे,ती संपवली पाहिजे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
खासदार गोपाळ शेट्टी आपल्या भाषणात म्हणाले की, येथील 7 एकरच्या जागेत 18 वर्षांपूर्वी स्वातंत्र्यवीर स्वावरकर उद्यान उभारताना येथील 14 आदिवासी बांधवांना सन्मानाने येथील जवळच्या जागेत स्थलांतरीत करून उत्तर मुंबईकरांना अभिमान वाटावा असे राजकीय जीवनात गेली 40 ते 42 वर्ष माझ्या बरोबर असलेल्या कार्यकर्त्याच्या सहकार्याने आकर्षक उद्यान उभे केले हा किस्सा त्यांनी सांगितला.
सावरकर हे द्रष्टा होते,ते कठीण जीवन जगले.बलशाशी भारत हो याचे ते पुरस्कर्ते होते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंती दिनी नव्या संसद भवन उदघाटन केले ही देशवासियांसाठी मोठी अभिमानाची बाब आहे असे गौरवोद्गार त्यांनी काढले.