पंढरीच्या वाटेत मिळणार ‘साक्षरतेचा प्रसाद’; निरक्षरांची नोंदणी करून गावी येताच धडे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2024 10:03 AM2024-07-01T10:03:41+5:302024-07-01T10:04:01+5:30
वारकऱ्यांमधील जे लोक निरक्षर आहेत, त्यांची उल्लास ॲपवर नोंदणी करणार आहेत. त्यासाठी संबंधित गावांतील शाळेचीही मदत घेतली जाईल.
अविनाश साबापुरे
यवतमाळ : आषाढी एकादशीसाठी पंढरीकडे निघालेल्या वारकऱ्यांची वाटेतच साक्षरता मोहिमेसाठी नोंदणी केली जाणार आहे. पांडुरंगाच्या दर्शनानंतर गावी परतल्यावर या वारकऱ्यांना स्थानिक शिक्षकांमार्फत धडे दिले जाणार आहेत, तर सप्टेंबरमध्ये त्यांची परीक्षा घेऊन साक्षरतेचे प्रमाणपत्रही बहाल केले जाणार आहे. त्यामुळे गावोगावच्या निरक्षर वारकऱ्यांना यंदा पांडुरंग साक्षरतेच्या रूपाने पावणार आहे.
वारीदरम्यान करायच्या या नोंदणीसाठी योजना शिक्षण संचालनालयाने नियोजन केले आहे. शिक्षण संचालक डाॅ. महेश पालकर यांनी सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना शुक्रवारीच तसे लेखी कळविले आहे. सध्या बहुतांश खेड्यांतून शेकडो वारकरी पंढरीकडे निघालेले आहेत. दररोज ३० ते ४० किलोमीटर चालून हे वारकरी एखाद्या गावात मुक्काम करतात. अशा ठिकाणी ‘नवभारत साक्षरता कार्यक्रमा’चे पथक त्यांची भेट घेणार आहे. वारकऱ्यांमधील जे लोक निरक्षर आहेत, त्यांची उल्लास ॲपवर नोंदणी करणार आहेत. त्यासाठी संबंधित गावांतील शाळेचीही मदत घेतली जाईल.
गेले सांगून ज्ञाना-तुका, झाला उशीर तरी शिका!
आळंदी आणि देहूमधून निघालेल्या दिंडीमध्ये ‘नवभारत साक्षरता कार्यक्रमा’ची माहिती सांगणारी एक व्हॅन सहभागी झाली आहे.
पालखी मार्गावर पथनाट्य, बॅनर, स्लोगन, घडीपत्रिका, घोषवाक्यांचे फ्लेक्सच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. ‘गेले सांगून ज्ञाना-तुका, झाला उशीर तरीही शिका’ अशा गीतांद्वारे प्रचार केला जात आहे, अशी माहिती योजना शिक्षण उपसंचालक राजेश क्षीरसागर यांनी दिली.