बच्चू कडू कोणत्या मोहिमेवर? अंतरवाली सराटीमध्येच तळ ठोकणार; रात्रीच घेतली जरांगेंची भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2023 11:18 AM2023-11-02T11:18:07+5:302023-11-02T11:18:31+5:30
जरांगे पाटलांनी त्यांच्या पत्रकार परिषदांमध्ये बच्चू कडूंची अनेकदा स्तुती केली होती. काल रात्री देखील कडू जेव्हा उपोषण स्थळी पोहोचले तेव्हा जरांगे पाटलांनी त्यांच्याशी चर्चा केली.
शिंदे सरकारमध्ये मंत्रिपद न मिळाल्याने वेळोवेळी उघड नाराजी व्यक्त करणारे आमदार बच्चू कडू हे काल रात्रीच मराठा आंदोलन सुरु असलेल्या अंतरवाली सराटीमध्ये पोहोचले आहेत. पुढील काही दिवस ते तिथेच तळ ठोकणार आहेत.
जरांगे पाटलांनी त्यांच्या पत्रकार परिषदांमध्ये बच्चू कडूंची अनेकदा स्तुती केली होती. काल रात्री देखील कडू जेव्हा उपोषण स्थळी पोहोचले तेव्हा जरांगे पाटलांनी त्यांच्याशी चर्चा केली. आज जरांगे पाटलांना समजावण्यासाठी सरकारचे शिष्टमंडळ येणार आहे.
या शिष्टमंडळामध्ये राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती आनंद निरगुडे यांच्यासह निवृत्त न्यायमूर्ती आणि मुख्यमंत्र्यांचे सचिव जरंगे पाटील यांच्या भेटीला जाणार आहेत. यावेळी सरकारकडून मराठा आरक्षणासाठी कायदेशीर बाजू त्यांना समजवून सांगितली जाणार आहे, तसेच त्यांना उपोषण मागे घेण्यासही सांगितले जाणार आहे.
बच्चू कडू हे सरकार आणि जरांगे पाटील यांच्यात मध्यस्थी करणार असल्याचे समजते आहे. सरकार आणि आंदोलकांमधील संवाद थांबला आहे. तसेच ज्या ज्या सत्ताधाऱ्यांनी जरांगे पाटलांना फोन केला त्यांना पाटलांनी ठामपणे नकार दिला होता. परंतू, बच्चू कडूंना तिथे वेगळी वागणूक मिळाली आहे. यामुळे बच्चू कडू या दोघांमधील संवादाचा महत्वाचा दुवा ठरू शकणार आहेत.