'जाणत्या राजा'ने दिला 'कानमंत्र': अन् 'पुनश्च हरिओम'चा नारा देत सुरू झाला राज्यकारभार!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2020 10:38 AM2020-07-26T10:38:30+5:302020-07-26T10:44:39+5:30
‘उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही’असा शब्द त्यानं ‘जाणत्या राजा’ला दिला आणि तो ‘पुनश्च हरिओम’चा जप करत राज्यकारभार करू लागला...
सध्या श्रावण हिरवी शाल पांघरून आलाय. हा सणांचा पवित्र महिना. त्यात वसा घेतला जातो, व्रत-वैकल्ये पाळतात. सणा-वारांच्या कहाण्या पारंपरिकरित्या ऐकवल्या जातात. अशीच एक कहाणी आपल्यासाठी घेऊन आलो आहोत.
--------------------
ऐका जनताजनार्दन देवा तुमची (कर्म)कहाणी. एका समृद्ध राज्यात एक आटपाट नगर होतं. त्या राज्याची ती राजधानी होती. ‘चांद्रसेनीय’ वंशातला राजा उद्धवगुप्त तेथे गुप्तशैलीत राज्य करत होता. त्याच्या या अजब शैलीमुळेच ‘उद्धवा अजब तुझे सरकार’ असे त्याचे शत्रू म्हणत. उद्धवगुप्तपाशी त्याच्या पित्यानं उभारलेली चतुरंग सेना होती. त्याचे पिता मोठे शूरवीर होते. त्यांनी अल्पकाळात प्रत्यक्ष राज्य केले, तरी जनतेच्या हृदयावर अखंड साम्राज्य केल्याने हृदयसम्राट होते; परंतु त्यांना पुन्हा प्रत्यक्ष राज्य करता आले नाही. हाती सत्ता नसतानाच त्यांचे निधन झाले. उद्धवगुप्तने त्यांना शब्द दिला होता की, त्यांच्या शिलेदारास पुन्हा राज्य मिळवून देईन. त्याने शब्द आपला येन केन प्रकारे खरा केला अन् तो स्वत:च गादीवर बसला.
राज्य मिळवण्याच्या या मोहिमेत त्याने आपला ‘मोठा भाऊ देवेंद्रकमल’वर मात केली. त्यासाठी शत्रूसैन्याशी हातमिळवणी केली. ते देवेंद्रकमलला पटले नाही. याआधी त्याचा राज्याभिषेक झाला होता. या लढाईआधीपासून तो ‘मी पुन्हा येईन’ असं छातीठोकपणे सांगत होता. युद्धात त्याला शह मिळाला, तरीही त्याच्याकडे अधिक सैन्यबल असल्यामुळे त्याने उद्धवगुप्तला शह देण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी शत्रुपक्षाच्या बलाढ्य सरदाराशी हातमिळवणी केली आणि भल्या सकाळी राज्यारोहण करण्याचा प्रयत्न केला, मात्र उद्धवगुप्ताने शत्रू सैन्याचे महाधुरंधर ‘जाणत्या राजा’शी संगनमत केले होते. या जाणत्या राजाने ‘देवेंद्रकमल’चा हा मनसुबा हाणून पाडला. अखेर उद्धवगुप्तने राज्य मिळवले. याकामी त्याला त्याचा चाणाक्ष शिलेदार संजय कामी आला, अंध धृतराष्ट्राला जसे संजयाने आपल्या डोळ्याने महाभारत दर्शन घडवले तद्वत या संजयाने उद्धवगुप्तला राज्यारोहण करण्याची वेगळी दृष्टी दाखवली. ती उद्धवगुप्तने डोळसपणे स्वीकारून राज्यारोहण केले. मात्र आपला राजपुत्र आणि राणीसरकार यांचा सल्ल्यानेच तो राज्यकारभार करू लागला. हा प्रवास मोठ्या अडथळ्यांचा होता. त्या प्रदेशातील ‘चक्रवर्ती सम्राटा’ला ‘देवेंद्रकमला’स सिंहासनावर बसवायचे होते. या सम्राटाची नाराजी पत्करून उद्धवगुप्त गादीवर आलाच. तो गादीवर येताच त्या राज्यात भयंकर महामारी आली. त्यामुळे सगळा कारभार ठप्प झाला. सरदार-राव-रंक अवघे जण भयभीत जाहले. श्वासोच्छवास, स्पर्शातून ही महामारी झपाट्याने पसरू लागली. पण उद्धवगुप्त डगमगला नाही. तो आपल्या महालीच भूमिगत जाहला. तेथून तो आपल्या प्रजेला घरोघरच्या मुखपुस्तकातून प्रकट संदेश देऊ लागला. हे संदेशही मोठे अजब असत. एकदा तर त्याने महामारीच्या रोगासोबत राहूयात पण त्या रोगाला आपल्यासह राहायचे आहे का, असा जबरदस्त सवाल विचारला. तो ऐकून समस्त प्रजेने मुखाच्छादनाखाली आपले मुख घाबरून झाकून घेतले. या महामारीला रोखण्यासाठी अंतर राखून व्यवहार करायचे. गर्दीत मिसळायचे नाही. सतत हस्तप्रक्षालन करायचे. असे वैद्यांनी सांगितल्याने उद्धवगुप्त प्रजेशी अंतर ठेवून वागायला लागला. प्रजेशीच काय, तो तर आपल्या मंत्रिगणांपासूनही अंतर राखून वागायला लागला. त्यामुळे त्याचे शत्रू ‘हात धुऊन’च त्याच्या मागे लागले. त्याला गादीवर बसवणाऱ्या ‘वानप्रस्थाश्रमी धुरंदर जाणत्या राजा’ला हे अजिबात पसंत पडले नाही. प्रजेत गेल्याशिवाय या ‘जाणत्या राजा’ला चैन पडत नसे. त्यामुळे ते तडक उद्धवगुप्तच्या महाली गेले. त्याने उद्धवगुप्तला जनसेवेच्या व्रताचे स्मरण करून दिले. देवेंद्रकमल पुन्हा गादी बळकावेल असा इशारा त्याला दिला. ‘उतू नकोस मातू नकोस घेतला वसा टाकू नकोस’ असा वडीलकीचा सल्ला त्याला दिला. त्यासाठी त्याला ‘पुनश्च हरिओम’चा मंत्र जपण्यास त्यानं सांगितलं. वाढत्या महामारीनं प्रजा कितीही भयभीत असो, ठिकठिकाणचे व्यवहार ठप्प असले, तरी हे संपण्यासाठी ‘पुनश्च हरिओम’चा जप करत रहायचं व्रत त्यानं घेतलं. ‘उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही’ असा शब्द त्यानं ‘जाणत्या राजा’ला दिला आणि तो ‘पुनश्च हरिओम’चा जप करत राज्यकारभार करू लागला. राजा उद्धवगुप्तप्रमाणे ‘पुनश्च हरिओम’ मंत्राचा जप करून आपणही शारीरिक अंतर, मुखाच्छादन आणि सतत हस्तप्रक्षालनाचे व्रत अमलात आणूयात. ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी (नव्हे पाच वर्षांनी ) सुफळ संपूर्ण होवो, हीच जनताजनार्दन चरणी प्रार्थना! - अभय नरहर जोशी