राज्याला पुन्हा एकदा हुडहुडी! लाँग वीकएण्ड होणार ठंडा ठंडा, कूल कूल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 03:59 AM2018-01-25T03:59:01+5:302018-01-25T03:59:19+5:30
संक्रातीनंतर गायब झालेली थंडी अचानक परतल्याने राज्याला पुन्हा एकदा हुडहुडी भरली आहे. वसंत पंचमीच्या ऐन भरात झोंबणारा हा गारवा मुंबई, कोकणासाठी आल्हाददायक असला, तरी उर्वरित महाराष्ट्र मात्र पार गारठून गेला आहे.
पुणे : संक्रातीनंतर गायब झालेली थंडी अचानक परतल्याने राज्याला पुन्हा एकदा हुडहुडी भरली आहे. वसंत पंचमीच्या ऐन भरात झोंबणारा हा गारवा मुंबई, कोकणासाठी आल्हाददायक असला, तरी उर्वरित महाराष्ट्र मात्र पार गारठून गेला आहे.
उत्तराखंड, चंदीगड, पंजाब, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, उत्तर राजस्थान या परिसरात थंडीची लाट आली आहे़ जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेशाच्या काही भागांत तर बर्फवृष्टी होत आहे़ तिकडून येणाºया थंड वाºयांचा जोर वाढल्याने राज्यातील तापमानाचा पारा वेगाने खाली आला आहे.
नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी किमान तापमानात मोठी घट झाली आहे़ नाशकात बुधवारी ८.८ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविले गेले़ विदर्भ, मराठवाडा व मध्य महाराष्ट्रातील काही भागातही गारठा कमालीचा वाढला आहे. विशेषत: ग्रामीण भाग थंडगार पडला आहे. मुंबईतही दिवसभर थंड वारे वाहत होते. यंदा म्हणावी तशी थंडी जाणवलीच नाही, अशी प्रतिक्रिया देणा-या ठाणे जिल्ह्यातील रहिवाशांना येत्या आठवड्यात मस्त गारेगार वातावरण अनुभवण्याची संधी मिळणार आहे. शुक्रवारपासून सुरू होणा-या लाँग वीकएण्डला वाढत्या थंडीची सुखद जोड मिळणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. त्यामुळे सुट्या, त्याला जोडून होणा-या सहली अधिक आल्हाददायी, गुलाबी होण्याची चिन्हे आहेत.
माघ महिन्यात मस्त थंडी पडते, असा नेहमीचा अनुभव असला; तरी गेल्या पंधरवड्यात थंडी टप्प्याटप्प्याने कमी होत गेली. दुपारी तर घाम फुटावा, इतका उष्मा जाणवत होता. मात्र गेल्या तीन दिवसांत थंडीने पुन्हा गारेगार अनुभव देण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे अनेक घरांतील एसी बंद झाले. उबदार अंथरूणे, स्वेटर, शाली-मफलर, लोकरीचे स्कार्फ, कानटोप्या, ग्लोव्हज् अशी सारी थंडीची आयुधे अंग झटकून बाहेर आली. लोकलच्या खिडक्या-पंखे पहाटे-रात्री बंद होऊ लागले. मुंबई-ठाणेकरांना गुलाबी वाटावी इतपत थंडी जाणवू लागल्याने ती परतल्याचा अनुभव येऊ लागला. सोबतच गार वाºयांनी थंडीचा कडाका वाढवत नेला.
लाँग वीकएण्डनिमित्त बाहेर जाण्याचे प्लॅन करणाºयांना, प्रवास करणाºयांना थंडीने चांगलाच दिलासा दिला. सध्याच्या आल्हाददायी वातावरणामुळे त्यांच्या फिरण्याचा आनंद द्विगुणित होणार असे वाटत असतानाच हवामान खात्याने थंडी वाढत जाईल, असे सांगत सुखद दिलासा दिला. शुक्रवारपासून थंडी वाढत जाईल आणि सध्या १९ ते २१ अंशांदरम्यान असलेले तापमान एक ते दोन अंशांनी घटेल, असा सध्याचा अंदाज आहे. पुढील संपूर्ण आठवडा थंडीचा मुक्काम असेल. त्यात रविवारचे रात्रीचे तापमान घसरून १७ अंशांपर्यंत खाली जाईल, असा ठोकताळा मांडण्यात आला आहे. आठवडाभर रात्री हे तापमान १८ ते १९ अंशांदरम्यान राहण्याची चिन्हे आहेत.
ग्रामीण भागात तापमानाचा पारा नेहमीच एक किंवा दोन अंशांनी कमी असतो. त्यामुळे तेथेही पारा जरी १७ ते १९ अंशांदरम्यान राहणार असला, तरी प्रत्यक्षात १६ अंशांइतका गारवा जाणवेल, असाही अंदाज आहे.
आंब्याला येणार मोहोर,
हरभराही तरारणार!
मस्त थंडी पडली, की आंब्याला छान मोहोर येतो आणि स्वाभाविकपणे जोमदार फळे धरतात, असा शेतकºयांचा अनुभव आहे. गेल्यावर्षी अवेळी हजेरी लावलेल्या पावसाने मोहोरालाही फटका बसला होता आणि नंतर फळ धरण्याच्या काळात आलल्या पावसाने अंबा गळून पडला होता. यंदा सध्याची परिस्थिती आंब्याला पोषक आहे. त्यामुळे मोहोर चांगला येईल आणि फळधरणीही चांगली होईल, असे मानले जाते. सध्या ठिकठिकाणी हरभ-याची लागवड झाली आहे. थंडी, पहाटे पडणारे दव यामुळे हरभरा तरारून येतो. या खेरीज पालेभाज्या, फुलांच्या लागवडीलाही हे वातावरण पोषक ठरते.
पुन्हा धुक्याची दुलई? : थंडी वाढू लागली की पहाटेच्या सुमारास पडणारे धुकेही दाट होत जाते. दोन आठवड्यांपूर्वी थंडीमुळे धुके वाढत गेले. त्यात प्रदूषणाची भर पडली आणि लोकल वाहतूक, रस्त्यावरील-खास करून घाटातील वाहतुकीला त्याचा फटका बसला. पुढच्या आठवड्यातही धुके दाटून आले तर दृश्यमानता कमी होण्याचा धोका आहे.
अशी असेल माघाची थंडी...
सध्याचे रात्रीचे तापमान - १९ ते २१ अंश सेल्सियस
शनिवारपर्यंतचा अंदाज - १८ अंश सेल्सियसचा
रविवारचे तापमान - १७ अंश सेल्सियस
पुढील आठवड्यातील सरासरी - १८ ते १९ अंश सेल्सियस
राज्याच्या विविध शहरांतील तापमान -
पुणे ११, अहमदनगर १२़.५, जळगाव ११़.६, कोल्हापूर १५़.९, महाबळेश्वर १२़२, मालेगाव १२़४, नाशिक ८.८, सांगली १५, सातारा ११़.८, सोलापूर १६़.३, मुंबई १९, सांताक्रुझ १५़.४, अलिबाग १७़.४, रत्नागिरी १७़.६, पणजी १९़.५, डहाणू १५़.५, भिरा १३़.९, औरंगाबाद १४़.२, परभणी १३़.५, नांदेड १४़.५, बीड १२़.२, अकोला १४़.५, अमरावती १४, बुलडाणा १५़.६, ब्रम्हपुरी १२़.८, चंद्रपूर १४, गोंदिया १३़.५, नागपूर १५़.६, वाशिम १३़.२, वर्धा १५़.८, यवतमाळ १४़ (अंश सेल्सिअस).