पुन्हा एकदा जिओ और जीने दोचा प्रत्यय
By Admin | Published: July 27, 2016 10:21 PM2016-07-27T22:21:11+5:302016-07-27T22:21:11+5:30
हैद्राबादेत कत्तलखान्यात जाणाऱ्या ८३ उंटांना जीवदान देऊन पुन्हा एकदा जैन बांधवांनी 'जिओ और जीने दो' चा प्रत्यय घडविला आहे
अहिंसा परमो धर्म : हैद्राबादेत कत्तलखान्यात जाणाऱ्या ८३ उंटांना सोडविले
औरंगाबाद- हैद्राबादेत कत्तलखान्यात जाणाऱ्या ८३ उंटांना जीवदान देऊन पुन्हा एकदा जैन बांधवांनी 'जिओ और जीने दो' चा प्रत्यय घडविला आहे. बुधवारी सायंकाळी २० ट्रकद्वारे उंट कर्णपुरा मैदानात आणण्यात आली. येथून हे उंट राजस्थान येथील सिरोही परिसरातील पांजरापोळ येथे नेण्यात येणार आहे. तिथेच त्यांचा सांभाळ करण्यात येणार आहे.
अहिंसा परमो धर्माचे पालन करीत जैन बांधवांनी कत्तलखान्यात जाणाऱ्या ८३ उंटांना वाचवून एक आदर्श निर्माण केला आहे. हैद्राबादेतील जैन बांधवांनी ही उंट सोडविली व पालनपोषणासाठी राजस्थानमधील पांजरापोळकडे रवाना केली. २० ट्रकमध्येही उंट ठेवण्यात आली आहेत.
राजस्थानकडे जाताना उंटांचा हा ताफा रात्री ८ वाजता औरंगाबादेत पोहोचला. कर्णपुऱ्यात सकल जैन समाज व जैन अलर्ट ग्रुपच्यावतीने उंटांची व्यवस्था करण्यात आली होती. येथे मुनीश्री निलेशचंद्र विजयजी म.सा., मुनिश्री यशचंद्र विजयी म.सा. व मुनिश्री पुनित विजयजी म.सा. यांनी मांगलिक दिली. तत्पूर्वी ४ वाजता आचार्य गुप्तीनंदीजी गुरुदेव ससंघ, राष्ट्रसंत कमलमुनी कमलेश म.सा., पद्ममुनिजी म.सा., मुनिश्री निलेशचंद्र विजयजी म.सा., साध्वीजी प्रज्ञाश्रीजी म.सा., साध्वीजी सुमीताश्रीजी म.सा., साध्वी सत्यवतीजी म.सा., साध्वी प्रशांतकंवरजी म.सा. यांचे पदयात्रेने जयघोषात कर्णपुऱ्यातील मुनिसुव्रत स्वामी जैन मंदिर येथे आगमन झाले. यावेळी पावसाच्या आगमनाने आनंदीवातावरण निर्माण झाले होते.
ना हिंसा करेगे ना हिंसा होने देंगेह्ण असे सांगत राष्ट्रसंत कमलमुनी कमलेश म.सा. म्हणाले की, अहिंसेचे पालन करणाऱ्यांनी हिंसा विरोधात एकवटून आवाज बुलंद केला पाहिजे. कत्तलखाने बंद करण्यासाठी सर्व समाजातील अहिंसाप्रेमींनी एकत्र येऊन सरकारवर दबाव आणला पाहिजे. पशूची रक्षा म्हणजे पर्यावरणाची, पृथ्वीची व मानवजातीची रक्षा करणे होय, असा संदेश त्यांनी दिला. गुप्तीनंदीजी गुरुदेव म्हणाले की, हिंसेचा विरोध न करणारे त्या हिंसेत अप्रत्यक्षपणे भागीदार असतात. नुसतेच ह्यजीओ और जिने दो ची घोषणा देऊन चालणार नाही तर प्रत्यक्षात हिंसे विरोधात आवाज बुलंद करा. प्राणी हत्या करुन तयार केलेले लिपस्टिक, पावडर, चामडी बुट, पट्टे खरेदी करणे बंद करा, असे आवाहनही गुरुदेव यांनी केले.
जैन समाजात विविध पंथ आहेत मात्र, सिद्धांत एकच आहे जीओ और जिने दो असे मुनीश्री निलेशचंद्र विजयजी म.सा. यांनी सांगितले. सूत्रसंचालन संजय संचेती यांनी केले. यावेळी डॉ.शांतीलाल संचेती, प्रकाश बाफना, मिठालाल कांकरिया, विजयराज संघवी, अशोक अजमेरा, रतीलाल मुगदिया, ताराचंद बाफना, कांतीलाल बोथरा. डि.बी.कासलीवाल, महावीर ठोले,सुनील काला, डॉ.रमेश बडजाते, चांदमल चांदीवाल, रवी मुगदिया, एम.आर.बडजाते, कांतीलाल बोथरा, दिलीप मुगदिया, जैन अलर्ट ग्रुपचे सदस्य व जैनबांधव मोठ्या संख्यने हजर होते.
उंटांचा ताफा उद्या पोहचणार राजस्थानात
ग्रेटर हैदराबाद सोसायटी फॉर प्रिव्हेंशन क्रुएलटी टू अनिमल या संघटनेचे सुरेंद्र भंडारी यांनी सांगितले की, २० ट्रकमध्ये ८३ उंटांना घेऊन आम्ही सोमवारी मध्यरात्री हैदराबादहून निघालो. आज रात्री औरंगाबादेत आलो असून शुक्रवारी रात्रीपर्यंत राजस्थानमधील सिरोही येथील पांजरापोळ येथे पोहोचणार आहोत. तिथे या उंटांचा सांभाळ करण्यात येईल. या कार्यात संघटनेचे दत्तात्रय जोशी, डॉ.विश्वचैतन्या, दिनेशकुमार आचलिया, अमितकुमार आचलिया हे पदाधिकारी सहकार्य करीत आहेत.