मंत्रिमंडळ विस्ताराला घटस्थापनेचा मुहूर्त, पुन्हा एकदा हालचालींनी धरला वेग
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2023 07:46 AM2023-10-08T07:46:16+5:302023-10-08T07:48:30+5:30
घटस्थापनेच्या पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशीच विस्तार होईल, असे नक्की सांगता येणार नाही; पण नवरात्र उत्सवाच्या काळात विस्तार होईल, असा दावा राष्ट्रवादीच्या एका नेत्याने नाव न देण्याच्या अटीवर केला.
मुंबई : राज्यातील महायुती मंत्रिमंडळाचा रखडलेला विस्तार नवरात्र उत्सव काळात होईल, असा अंदाज आहे. त्यासाठी हालचालींनादेखील पुन्हा एकदा वेग आला आहे. घटस्थापनेच्या पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशीच विस्तार होईल, असे नक्की सांगता येणार नाही; पण नवरात्र उत्सवाच्या काळात विस्तार होईल, असा दावा राष्ट्रवादीच्या एका नेत्याने नाव न देण्याच्या अटीवर केला.
गणेशोत्सवाच्या काळात विस्तार होईल, असे विधान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केले होते. मात्र, तो मुहूर्त चुकला होता. आता पुन्हा १५ किंवा १६ ऑक्टोबरला विस्तार होईल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अलीकडेच दिल्लीत भाजप श्रेष्ठींना भेटले होते. त्यावेळी श्रेष्ठींनी विस्ताराला हिरवा झेंडा दाखवला, असे म्हटले जाते. विस्तारासंदर्भात राज्य सरकारमधील तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
फेरबदलाचीही शक्यता?
मंत्रिमंडळाच्या विस्तारासोबतच काही फेरबदल होण्याची शक्यतादेखील व्यक्त करण्यात येत आहे. हा फेरबदल केवळ खात्यांचा असेल की काही मंत्र्यांना वगळले जाईल, याबाबत स्पष्ट माहिती मिळू शकलेली नाही.
आणखी १४ मंत्र्यांच्या समावेशाची शक्यता
राज्य मंत्रिमंडळात सध्या २९ मंत्री कॅबिनेट आहेत. त्यातील भाजपचे १०, शिंदे यांच्या शिवसेनेचे १० आणि राष्ट्रवादीचे ९ मंत्री आहेत, एकूण मंत्री संख्या जास्तीत जास्त ४३ राहू शकते. याचा अर्थ आणखी चार राज्यमंत्र्यांसह १४ जणांचा समावेश होऊ शकतो.
काेणाला हवी किती मंत्रिपदे?
भाजपला आठ मंत्रिपदे हवी आहेत आणि दोन मित्रपक्षांनी सहा मंत्रिपदे घ्यावीत, असा भाजपचा आग्रह आहे. मात्र, दोन्ही मित्रपक्षांना प्रत्येकी किमान चार मंत्रिपदे हवी आहेत.
विस्तार लवकरच हाेणार
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार, यासंदर्भातील चर्चा सुरू आहेत.
- देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
९ मंत्र्यांची होणार हकालपट्टी
मंत्रिमंडळाच्या पुनर्रचनेनंतर ज्यांनी मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केले आहेत, ज्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत, असे ९ मंत्री मंत्रिमंडळात नसतील, त्यांच्या जागेवर नवीन चेहरे दिसतील.
- विजय वडेट्टीवार, विरोधी पक्षनेते, विधानसभा