वारज्यात पुन्हा जलवाहिनी फुटली
By admin | Published: October 17, 2016 01:11 AM2016-10-17T01:11:33+5:302016-10-17T01:11:33+5:30
साडेनऊ वाजता रुणवाल सोसायटी जवळील केतन हॉटेलसमोर पुन्हा जलवाहिनी फुटून हजारो लिटर पाणी रस्त्यावर वाहू लागले आहे.
कर्वेनगर : वारजे-माळवाडीमधील पॉप्युलरनगरसमोर कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्गावर काल जलवाहिनी फुटून अंदाजे वीस फूट उंचीचे कारंजे उडण्याची घटना ताजी असतानाच, आज रविवारी (दि. १६) सकाळी साडेनऊ वाजता रुणवाल सोसायटी जवळील केतन हॉटेलसमोर पुन्हा जलवाहिनी फुटून हजारो लिटर पाणी रस्त्यावर वाहू लागले आहे. तर महापालिकेने केलेल्या निकृष्ट कामांचे हे उदाहरण असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. तर अशा कामांची चौकशी व्हायला हवी, दर्जा तपासणीदेखील आवश्यक असल्याचे म्हटले आहे.
पॉप्युलरनगरसमोरील चौकात उड्डाणपुलाचे काम सुरू होणार असल्याने, वळण रस्त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सेवा रस्त्यावरील साईडपट्ट्या वाढवण्याचे काम सुरू केले आहे. काल शनिवारी (दि. १५) या कामासाठी खोदकाम करत असताना, सायंकाळी चारच्या सुमारास, जेसीबीचा धक्का लागून मुख्य जलवाहिनी फुटली. तेथे हजारो लिटर पाण्याची नासाडी झाली.
त्याला काही तास उलटत नाही तोच, महानगरपालिकेच्या वतीने रुणवाल सोसायटीजवळील केतन हॉटेलसमोर सेवा रस्त्याला बनवण्यात आलेल्या दुभाजक आणि सुशोभिकरणात मोठी शुद्ध पाण्याची जलवाहिनी फुटल्याने पाणी रस्त्यावरून वाहून, रस्त्यावर साचल्याचे पाहायला मिळाले. (वार्ताहर)