एकदा चार्ज केल्यानंतर 'बजाजची इलेक्ट्रीक चेतक' ९५ किलोमीटर अंतर कापणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2019 12:15 PM2019-11-15T12:15:43+5:302019-11-15T12:22:23+5:30
घरीच चार्ज करता येणार बजाजची इलेक्ट्रीक चेतक...
पुणे : येणारे वाहन युग हे इलेक्ट्रीकचे असणार आहे. त्यासाठी सुरुवातीच्या टप्प्यात चार्जिंग स्टेशनची समस्या उद्भवू शकते. हे ध्यानात घेत घरीच चार्ज करता येईल अशी बॅटरी बजाजच्या चेतक या मोपेडमधे बसविण्यात आली आहे. एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल ९५ किलोमीटर अंतर ही गाडी धावू शकेल.
नवी दिल्लीत १६ ऑक्टोबर रोजी झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या चेतक इलेक्ट्रीक यात्रेची सुरुवात झाली. गुरुवारी (दि. १४) ही यात्रा आकुर्डी येथे आली. बजाज आॅटो लिमिटेडचे अध्यक्ष राहुल बजाज यांनी यात्रेचे स्वागत केले. नागरी भागात वापरासाठी उपयुक्त ठरेल या दृष्टीने तिची रचना ठेवण्यात आली आहे. वाहनाची बॅटरी चार्ज करण्यासाठी होम चार्जिंग स्टेशन ग्राहकांना खरेदी करावे लागेल. घरगुती वापराच्या मीटरमधे कोणताही बदल न करता त्याद्वारे सहज चार्जिंग करता येईल.
बॅटरी संपूर्ण चार्ज करण्यासाठी पाच तासांचा कालावधी लागेल. एकदा चार्ज केल्यानंतर पाच तास वाहन चालू शकेल. वाहनाचा अधिकतम वेग हा ६० किलोमीटर प्रतितास राहील. तसेच, इको आणि स्पोर्ट्स या दोन मोडवर हे वाहन चालविता येईल. बॅटरीला तीन वर्षे अथवा ३० हजार किलोमीटर अंतरापर्यंत वॉरंटी असेल. तसेच, बॅटरीचे आयुष्य ७० हजार किलोमीटर पर्यंत असेल. जानेवारी-२०२० मधे ग्राहकांसाठी हे वाहन उपलब्ध होईल. वाहनाची किंमत अजून निश्चित नसली तरी, ती सव्वा लाख रुपयांच्या आसपास राहिल असा अंदाज आहे.
-------------------
ऑटोमोबाईल क्षेत्राला सवलतीची गरज नाही : बजाज
ऑटोमोबाईल क्षेत्राची एक वेगळी प्रतिष्ठा आहे. त्यामुळे या क्षेत्राने सवलती मागण्यासाठी कटोरा हाती घेण्याची गरज नाही. मागणीमधे केवळ दहा टक्के घट झाली आहे. अनेक उत्पादकांकडे मागणीच्या तुलनेत अधिक उत्पादन हाती असल्याने त्याची तीव्रता वाटते. व्यवसायात कधी ना कधी मंदीला सामोरे जावे लागते. मागणीतील दहा टक्के घट ही सामान्य आहे. या प्रसंगाला तोंड द्यायला हवे. त्यासाठी परदेशी बाजारपेठा धुंडाळाव्या लागतील. मात्र, काही उद्योग तसे करताना दिसत नाहीत. अफ्रिकी देशामधे विक्री होणाºया तीन दुचाकींपैकी एक बजाजची असल्याचे राहुल बजाज यांनी स्पष्ट केले.
--------------