एकेकाळी तुम्हीच राणेंचे प्रचारप्रमुख होता...; वैभव नाईकांनी किरण सामंतांना लीडची आठवण करून दिली
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2024 03:13 PM2024-04-05T15:13:23+5:302024-04-05T15:14:06+5:30
Vaibhav Naik on Kiran Samant, Nilesh Narayan Rane: किरण सामंत यांना एवढेच सांगतो की, ज्यांना तुम्ही निवडून आणू पाहताय ते दोन वेळा 2 लाख मतांनी पराभूत झाले आहेत. - वैभव नाईक
ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक कितीवेळा मुख्यमंत्र्यांच्या दालनात असतात, अशा शब्दांत टीका करणाऱ्या मंत्री उदय सामंत यांच्या भावावर नाईकांनी टीका केली आहे. तसेच निलेश राणे लोकसभेला पराभूत झाले तेव्हाच्या आकड्यांची देखील आठवण करून दिली आहे.
निलेश राणे यांना निवडून आणण्याआधी किरण सामंत यांनी स्वतःला उमेदवारी मिळवण्यासाठी काय प्रयत्न करावे लागतात, राणेंची किती लाचारी करावी लागते ते पहावे. कोणाला तरी खुश करण्यासाठी हे म्हणावे लागते याचा अंदाज लोकांना आहे. किरण सामंत यांना एवढेच सांगतो की, ज्यांना तुम्ही निवडून आणू पाहताय ते दोन वेळा 2 लाख मतांनी पराभूत झाले आहेत. एकदा तर तुम्ही त्यांचे प्रचार प्रमुख होता. आणि तुमच्याच रत्नागिरी जिल्ह्यात 40 हजार मते कमी पडली होती. विनायक राऊतांना 40 हजाराचे मताधिक्य होते. याचा अंदाज आल्यावर तुम्ही शिवसेनेत आलात, अशा शब्दांत वैभव नाईक यांनी शिंदे गटातून इच्छुक उमेदवार किरण सामंत यांना प्रत्यूत्तर दिले आहे.
जी ताकद तुम्ही लावताय, ती पैशाची ताकद लावून कुडाळ, मालवणमधील लोकांना विकत घेऊ इच्छिता काय? असा सवालही नाईकांनी केला आहे. पण माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर लोकांनी निष्ठावान म्हणून विश्वास ठेवला आहे. तुम्ही जी ताकद म्हणताय ती पैशाची ताकद या लोकांवर चालणार नाही. नारायण राणे यांना केंद्रीय मंत्री असून उमेदवारी मिळणार नाही तर निलेश राणे यांना उमेदवारी मिळणार नाही, हे तुम्हाला माहित आहे. त्यामुळे कोण कोण इच्छुक उमेदवार केलेत ते सुद्धा तुम्हाला आणि आम्हाला माहिती आहे. तुमच्या लोकसभेचे पाहिले बघा नंतर आपण विधानसभेचे पाहू, अशा शब्दांत नाईक यांनी सामंतांना आव्हान दिले आहे.
तसेच निलेश राणेंवर टीका करताना नाईकांनी एक सल्लाही दिला आहे. आम्ही मातोश्री आणि उद्धवजींशी निष्ठावान आहोत. तुम्ही सातत्याने बॉस बदलत असता, तुमचा बॉस आता सागर बंगल्यावर बसला आहे. तुम्ही तिथे वॉचमनगिरी करता. आता तुम्हाला एक सल्ला आहे, तुमचे वडील आता केंद्रीय मंत्री असूनही तिकीट मिळाले नाही. तिकीट मिळवण्यासाठी त्यांची धडपड सुरु आहे. आपण जिथे वॉचमन आहात आणि आपले जिथे बॉस बसलेत तिकडे जाऊन उमेदवारी मिळते की नाही हे पाहावे. तिकीट मिळवण्यासाठी काहीतरी प्रयत्न करा, म्हणजे तुमच्या वॉचमन गिरीचा वडीलांना काहीतरी फायदा होईल, असा टोला नाईक यांनी लगावला आहे.