२१ गायकांचा एक सूर...आम्ही महाराष्ट्रीयन..! गाणे आता यूट्युबवर
By Admin | Published: April 12, 2016 05:29 AM2016-04-12T05:29:05+5:302016-04-12T12:32:01+5:30
‘महाराष्ट्रीयन... आम्ही महाराष्ट्रीयन...’ असे म्हणणारे हे गीत राज्यासह देशातल्या ख्यातनाम अशा २१ गायकांनी गायले असून, ते आता यूट्युबवर रसिकांना उपल्बध झाले आहे.
मुंबई :
धाव जरी पोटासाठी,
डोळ्यात स्वप्ने मोठी...
मुलखात कित्येकांना
आहे दिला आसरा...
गर्दी ही इथली न्यारी,
दिसे आईना बिलोरी
प्रतिरूप भासे भारताचे
हसरे रुपेरी...
अशा आश्वासक शब्दरचनेसह महाराष्ट्राचे नवे गीत आकाराला आले आहे. ‘महाराष्ट्रीयन... आम्ही महाराष्ट्रीयन...’ असे म्हणणारे हे गीत राज्यासह देशातल्या ख्यातनाम अशा २१ गायकांनी गायले असून, ते आता यूट्युबवर रसिकांना उपल्बध झाले आहे.
चार मिनिटांचे हे सुरेख गाणे अरुण म्हात्रे या नामवंत कवीने लिहिले असून, परीक्षित भातखंडे यांनी त्याला संगीताचा साज चढवला आहे. सुरेश वाडकर, शंकर महादेवन, रूपकुमार राठोड, जावेद अली, सुनाली राठोड, अनुराधा पौडवाल, साधना सरगम, वैशाली सामंत, स्वप्निल बांदोडकर, बेला शेंडे, महालक्ष्मी अय्यर, अजित परब यांच्यासह मंगेश बोरगावकर, कीर्ती किल्लेदार, श्रीरंग भावे, धवल चांदवडकर, स्वप्निल गोडबोले, सावनी रवींद्र, सायली पंकज, आनंदी जोशी आणि रीवा राठोड या नव्या दमाच्या गायकांनी ‘आम्ही महाराष्ट्रीयन.. आम्ही महाराष्ट्रीयन...’चा ठेका धरला आहे.
या गाण्याची चित्रफीत मराठीतील प्रसिद्ध अभिनेता पुष्कर श्रोत्री यांनी दिग्दर्शित केली असून, सगळ्या गायकांच्या पाठीमागे महाराष्ट्रातील विविध कला, परंपरा, संस्कृतीचे दर्शन घडविणारी सुंदर छायाचित्रे पाहायला मिळणार आहेत. ज्यांची जन्मभूमीच महाराष्ट्र आहे असे नव्हे, तर ज्यांची कर्मभूमीदेखील महाराष्ट्र आहे ते महाराष्ट्रीयन असा विचार मांडणाऱ्या या गाण्याची निर्मिती लोकमत वृत्तपत्र समूहाने केली आहे. या गाण्याचा एक मिनिटाचा भाग संजय गायकवाड आणि नरेंद्र हेटे यांच्या यूएफओ कंपनीच्या माध्यमातून राज्यातल्या सर्व चित्रपटगृहांत दाखविण्यात येणार आहे.