मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यात ‘वर्षा’वर दीड तास चर्चा; राजकीय भोंग्यावर रणनीती 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2022 08:45 AM2022-04-30T08:45:50+5:302022-04-30T08:46:23+5:30

भोंग्यावरुन राज ठाकरे यांची रविवारी औरंगाबाद येथे होत असलेली बहुचर्चित सभा, हनुमान चालीसा, खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांची अटक, केंद्रीय तपास यंत्रणांची कारवाई यामुळे वातावरण तापले आहे

One and a half hour discussion between CM Uddhav Thackeray and Sharad Pawar on 'Varsha' | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यात ‘वर्षा’वर दीड तास चर्चा; राजकीय भोंग्यावर रणनीती 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यात ‘वर्षा’वर दीड तास चर्चा; राजकीय भोंग्यावर रणनीती 

googlenewsNext

मुंबई : भोंगा प्रकरणावरुन सामाजिक, राजकीय वातावरण चांगलेच तापले असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शुक्रवारी वर्षा निवासस्थानी भेट घेतली. बंद दरवाज्याआड सुमारे दीड तास दोन नेत्यांमध्ये खलबते झाली. त्यांच्यातील चर्चेचा तपशील अधिकृतरित्या हाती आला नसला तरी, एकूणच ‘भोंगा’ हाच विषय चर्चेच्या केंद्रस्थानी होता. राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडवून महाविकास आघाडीचे सरकारच बरखास्त करण्याची चाल खेळली जात असून ती हाणून पाडण्यासाठी कशी रणनिती आखायची, यावरच चर्चेचा रोख होता, असे सूत्रांनी सांगितले.  

काेणता कानमंत्र दिला?
भोंग्यावरुन राज ठाकरे यांची रविवारी औरंगाबाद येथे होत असलेली बहुचर्चित सभा, हनुमान चालीसा, खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांची अटक, केंद्रीय तपास यंत्रणांची कारवाई यामुळे वातावरण तापले आहे. हीच संधी साधत दंगाधोपा घडवून कायदासुव्यस्था बिघडल्याचा ठपका ठेऊन महाविकास आघाडीचे सरकार बरखास्त करण्याचा डाव असल्याची खात्रीशीर माहिती संबंधित यंत्रणांकडून पवार यांच्या हाती आली आहे. त्यापार्श्वभूमीवर त्यांनी भेटीत उद्धव यांना कानमंत्र दिला आहे. 

सांगितले अनुभवाचे बोलही...
आमदार, खासदार, कार्यकर्ते यांनी भाजप मनसेला जशास तसे उत्तर दिले तरी सत्ताधीशांची नेमकी चाल कशी असावी, त्यादृष्टीने कोणती खबरदारी घेतली गेली पाहिजे, याबाबत अनुभवाचे बोलही पवार यांनी सांगितले. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांची रणनिती कशी असावी आणि प्रत्यक्ष सत्तेतील मंडळींनी ‘सामना’ करताना काय पथ्य पाळावे, याबाबतही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्यादृष्टीने ‘व्होट बॅंके’ला धक्का लागणार नाही, याची विशेष काळजी घेत हे प्रश्न हाताळताना होणारी कसरत आणि दमझाक याचीही जाणीव पवार यांनी करून दिल्याचे समजते.

‘रान’ उठल्याची खात्री
राज ठाकरेंच्या भोंगा सभांमुळे वातावरण चांगलंच तापू लागलं आहे. राज ठाकरेंनी पाडवा मेळावा आणि नंतर ठाण्यातील उत्तर सभेमध्ये मशिदींवरील भोंग्यांवरून मांडलेल्या भूमिकेमुळे ‘रान’ उठले आहे, याबाबत संबंधित यंत्रणांकडून माहिती घेऊन त्याबाबतची खात्री पक्की झाल्यानंतरच शरद पवार यांनी ही भेट घेतल्याचे एका जबाबदार नेत्याने सांगितले. 
 

Web Title: One and a half hour discussion between CM Uddhav Thackeray and Sharad Pawar on 'Varsha'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.