दीड लाख कोटींचा प्रकल्प गुजरातला गेला; महाराष्ट्राच्या १ लाख नोकऱ्या बुडाल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2022 06:32 AM2022-09-14T06:32:43+5:302022-09-14T06:33:08+5:30

हा प्रकल्प महाराष्ट्रात स्थापन होण्याबाबत महाविकास आघाडी सरकारच्या काळात हालचाली सुरू झाल्या होत्या.

One and a half lakh crore vedanta project to Gujarat; 1 lakh jobs of Maharashtra lost | दीड लाख कोटींचा प्रकल्प गुजरातला गेला; महाराष्ट्राच्या १ लाख नोकऱ्या बुडाल्या

दीड लाख कोटींचा प्रकल्प गुजरातला गेला; महाराष्ट्राच्या १ लाख नोकऱ्या बुडाल्या

googlenewsNext

मुंबई : महाराष्ट्रात येऊ घातलेला वेदांत-फॉक्सकॉन ग्रुपचा १ लाख ५४ हजार कोटींचा प्रकल्प गुजरातला गेला आहे. या प्रकल्पातून १ लाख नोकऱ्या उपलब्ध होणार होत्या. सेमीकंडक्टर निर्मितीचा(vedanta semiconductor) हा प्रकल्प गुजरातला स्थापन करण्यासंदर्भात वेदांत-फॉक्सकॉन ग्रुप आणि गुजरात सरकारमध्ये करार झाला आहे. वेदांत समूहाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी मंगळवारी याबाबत ट्विट करून ही माहिती दिली.

हा प्रकल्प महाराष्ट्रात स्थापन होण्याबाबत महाविकास आघाडी सरकारच्या काळात हालचाली सुरू झाल्या होत्या. तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई, उद्योग खात्याचे अधिकारी तसेच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वेदांत-फॉक्सकॉन ग्रुपबरोबर अनेक बैठका झाल्या. सरकारचा सकारात्मक प्रतिसाद पाहून हा प्रकल्प महाराष्ट्रातच करण्याचे या कंपनीने जाहीरही केले होते. हा प्रकल्प उभा करण्यासाठी पुणे जिल्ह्यातील तळेगाव इथली जागाही कंपनीने निश्चित केली होती.

महाराष्ट्रात सत्ताबदल झाल्यानंतर २६ जुलै २०२२ रोजी नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या कंपनीबरोबर या प्रकल्पाबाबत चर्चा केली होती. मात्र, त्यानंतर मंगळवारी कंपनीने अचानक हा प्रकल्प गुजरातला होणार असल्याचे जाहीर केले. या घडामोडीनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांना लक्ष्य करत आहेत. 

देशात आत्मनिर्भर सिलिकॉन व्हॅली सत्यात उतरणार आहे. या प्रकल्पामुळे  पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न पूर्ण होणार असून यामुळे आपली इलेक्ट्रॉनिक्स आयात कमी होईल. या प्रकल्पातून एक लाख रोजगार निर्मिती होणार आहे. - अनिल अग्रवाल, चेअरमन, वेदांत रिसोर्स लिमिटेड

आघाडी सरकारच्या काळात वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्पाला गुजरातपेक्षा चांगले पॅकेज तुम्ही का दिले नाही? हा प्रकल्प महाराष्ट्राला मिळाला नाही याचे दुःख आम्हालाही आहे, पण विरोधकांचे अश्रू मगरीचे आहेत. - आशिष शेलार, भाजपचे मुंबई अध्यक्ष

वेदांतचे प्रमुख अनिल अग्रवाल यांच्याशी आमची प्रदीर्घ चर्चा झाली होती. हा उद्योग महाराष्ट्रातच स्थापन करू, आमचे पूर्ण समाधान झाले आहे असे त्यांनी सांगितले होते. केवळ कागदपत्रांवर सह्या करायच्या बाकी होत्या. असे असताना अचानक हा महाराष्ट्राला मोठा धक्का बसला आहे. - सुभाष देसाई, तत्कालीन उद्योगमंत्री.

Web Title: One and a half lakh crore vedanta project to Gujarat; 1 lakh jobs of Maharashtra lost

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.