पदवीधर मतदारांची नोंदणी जेमतेम दीड टक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2020 10:00 PM2020-02-13T22:00:00+5:302020-02-13T22:00:02+5:30
मोठ्या प्रमाणावर पदवीधर मतदारांची नावे यादीत नाही.
पुणे : पदवीधर मतदानाची नोंदणी घेण्याची मोहीम हाती घेऊनही आत्तापर्यंत शिक्षितांच्या तुलनेत जेमतेम दीड टक्के मतदारांची नोंदणी झाली आहे. मोठ्या प्रमाणावर पदवीधर मतदारांची नावे यादीत नाही. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार एकही मतदार नोंदणी प्रक्रियेतून सुटता कामा नये. त्यामुळे मतदारनोंदणी प्रक्रिया सुलभ करण्याची मागणी प्रजासत्ताक भारत पक्षाने विभागीय आयुक्तांकडे केली आहे.
राज्यात झालेल्या २०१४च्या पदवीधर निवडणुकीत ५ लाख ९१ हजार ९५३ मतदारांची नोंदणी होती. शिक्षित लोकसंख्येच्या तुलनेत केवळ ३ टक्के मतदारांची नोंदणीच झाली आहे. त्यातील २५ टक्के मतदारांनीच मतदानाचा हक्क बजावला. शिक्षित मतदारांशी तुलना केल्यास १.२ टक्के मतदारांनीच मतदान केले. पुणे पदवीधर मतदारसंघामधे पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्हे येतात. येथील शिक्षित मतदारांची संख्या १ कोटी ९४ लाख ९० हजार ४७२ आहे. त्यातील दहा टक्के लोकसंख्याच पदवीधर असल्याचे ग्राह्य धरल्यास किमान १९ लाख ४९ हजार ४४ मतदार असतील.
माध्यमांमधून जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार ३ लाख १३ हजार ८८९ मतदारांची नोंदणी झाली आहे. मुळातच पदवीधर मतदारांची नोंदणीच अत्यल्प होते. त्यातील एक चतुर्थांश मतदार देखील मतदानाचा हक्क बजावत नाही. सोमवार ते शनिवार या कार्यालयीन वेळेत मतदार नोंदणी केली जाते. पदवीधर देखील याच काळात आपल्या कार्यालयीन कामात असतात. त्यामुळे रविवारसोडून इतर दिवशी त्यांना नोंदणीसाठी वेळ मिळत नाही. ऑनलाईन मतदार नोंदणी केल्यानंतर मतदाराला पुन्हा बोलावता कामा नये, अशी मागणी प्रजासत्ताक भारत पक्षाचे संस्थापक लक्ष्मण चव्हाण यांनी पुणे विभागीय आयुक्तालयाकडे केली आहे.
--
भर पगारी सुट्टी द्यावी
पदवीधर, शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूका देखील महत्त्वाच्या असतात. मात्र, या निवडणुकीसाठी केवळ चार तासांची सुट्टी असते. या मतदारसंघाची कक्षा पाच जिल्ह्यांची आहेत. पदवीधर रोजगारासाठी विविध ठिकाणी विखुरलेले आहेत. त्यांना लोकसभा-विधानसभा निवडणुकी प्रमाणे संपूर्ण दिवस भरपगारी सुट्टी दिली पाहिजे. मात्र, लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ मधील १३५-बी तरतुदीनुसार लेकसभा व विधानसभा निवडणुकीसाठीच भरपगारी रजा देण्याची तरतूद असल्याचे सांगितले जाते. यात बदल करण्याची मागणी भारत पक्षाचे संस्थापक लक्ष्मण चव्हाण यांनी केली आहे.
जिल्हानिहाय शिक्षितांचे प्रमाण
जिल्हा शिक्षितांची संख्या २०१९ पदवीधर नोंदणी
पुणे ८२,२०,३०८ ५८,२६२
सांगली २२,९८,२०४ ७९,४९६
सातारा २४,८७,०९७ ५३,२१८
कोल्हापूर ३१,५९,३२८ ८४,१४८
सोलापूर ३३,२५,५३५ ३८,७४५