नाशिकमध्ये पावसाचा दीड तास धुमाकूळ
By admin | Published: June 15, 2017 12:25 AM2017-06-15T00:25:28+5:302017-06-15T00:25:28+5:30
राज्यात मान्सूनची आगेकूच सुरूच असून बुधवारी नाशिकमध्ये पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला. दीड तासात शहरात ९२ मिलिमीटर पाऊस अर्थात अतिवृष्टी झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई/नाशिक/सोलापूर : राज्यात मान्सूनची आगेकूच सुरूच असून बुधवारी नाशिकमध्ये पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला. दीड तासात शहरात ९२ मिलिमीटर पाऊस अर्थात अतिवृष्टी झाली. मुसळधार पावसामुळे शहर जलमय झाले आणि जनजीवन विस्कळीत झाले. सराफ बाजारात पाण्याचा लोट आल्याने वाहने वाहून गेली.
संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास विजेच्या लखलखाटासह जोरदार पाऊस सुरू झाला. सराफ बाजार, कापडपेठेतील दुकानांमध्ये गुडघाभर पाणी साचल्याने मोठे नुकसान झाले. बुधवार हा आठवडे बाजाराचा दिवस असल्याने विक्रेते आणि शेतकऱ्यांची धावपळ झाली. काहींना भाजीपाला तेथेच टाकून पळावे लागले. व्यापारी संकुलांमध्ये पाणी शिरले. अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. जिल्हा न्यायालयात झाड पडून एक मुलगा जखमी झाला. तर काही ठिकाणी शॉर्टसर्किटने पथदीपांनी पेट घेतला होता. शहरात वीजपुरवठा खंडित झाला होता, तो सुरळीत करण्याचे काम सुरू होते.
अहमदनगर, सोलापूर, अमरावतीसह मराठवाड्यातही बुधवारी पावसाने दमदार हजेरी लावली. पुढील २४ तासांत उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. १७ व १८ जून रोजी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज आहे़
नगरला सहा वाड्यांचा संपर्क तुटला
जामखेड तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे साकत येथील लेंडी नदीला पूर आला आहे. त्यामुळे सहा वाड्या-वस्त्यांचा संपर्क तुटला आहे. सिमेंट बंधाऱ्यामुळे पुलावर तीन ते चार फूट पाणी वरून जात आहे. त्यामुळे बंधाऱ्याची एक फूट उंची कमी करण्यासाठी तोडफोड सुरू आहे. लेंडी नदीला पूर आल्ल्याने विद्यार्थ्यांना सक्तीची सुटी घ्यावी लागली आहे.
सोलापूरला जीप गेली वाहून
मुसळधार पावसाने ओढ्याच्या पाण्याचा अंदाज न आल्याने बार्शी येथे जीप वाहून गेली. नागरिकांनी तातडीने उपाययोजना केल्याने तिघांचे प्राण वाचले. मंगळवारी मध्यरात्री व बुधवारी पहाटे बार्शी तालुक्यात सरासरी ५४ मि.मी.पाऊस झाला. ढगफुटी झाल्याने नारी व परिसरातील शिवारात पाणीच पाणी झाल्याचे दिसत होते.
लातूरला मांजरा नदीला पाणी
लातूर शहर-परिसरात पाच दिवसांत १३१.४ मि.मी. पाऊस झाला असून मांजरा व तावरजा नदी वाहती झाली आहे. गतवर्षी या नदीपात्राचे खोलीकरण व रुंदीकरण झाले असून, शिऊर ते कव्ह्यापर्यंत नदीत पाणी स्थिरावले आहे. बीड जिल्ह्यात मंगळवारी रात्री काही ठिकाणी दमदार पाऊस झाला. जालना जिल्ह्यातील भोकरदन, परतूर तालुक्यांत मंगळवारी मध्यरात्रीनंतर जोरदार पाऊस झाला. उस्मानाबादमध्ये मध्यरात्री दमदार पावसाने हजेरी लावली.
अमरावतीला वादळी पाऊस
अमरावती जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले.
तीन दिवसांत विदर्भात
नैऋत्य मोसमी पावसाने बुधवारी आंध्र प्रदेश किनारपट्टी, पश्चिम मध्य व वायव्य बंगालच्या उपसागराचा उर्वरित भाग, दक्षिण छत्तीसगडच्या काही भाग व ओडिशाच्या आणखी काही भागात प्रवेश केला़ ३ ते ४ दिवसांत गुजरातचा काही भाग, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याचा उर्वरित भाग, विदर्भात वाटचाल करण्यासाठी मान्सूनला अनुकूल परिस्थिती आहे़