प्राप्तिकर अधिकाऱ्याकडे दीड किलो सोने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2017 05:26 AM2017-01-07T05:26:28+5:302017-01-07T05:26:28+5:30
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एक लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडलेल्या राजेंद्र बी. दोंड या प्राप्तिकर निरीक्षकाकडे तब्बल दीड किलो सोने मिळून आले आहे
पुणे : केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एक लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडलेल्या राजेंद्र बी. दोंड या प्राप्तिकर निरीक्षकाकडे तब्बल दीड किलो सोने मिळून आले आहे. घरझडतीमध्ये साडेतीनशे ग्रॅम तर बँकेच्या लॉकरमध्ये साडेबाराशे ग्रॅम सोने आढळल्याची माहिती अधीक्षक एम. आर. कडोळे यांनी दिली.
सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, दोंड हा प्राप्तिकर विभागामध्ये अधिकारी आहे. ढमाले यांनी २०१३ मध्ये खरेदी केलेल्या सदनिका व एक दुकानाच्या रेडी रेकनरच्या दरातील आणि खरेदी किंमतीमधील फरकाची तडजोड करुन देण्यासाठी दोंड याने पाच लाखांची लाच मागितली होती.
तक्रार दाखल होताच सीबीआयने सारसबागेजवळील विश्व हॉटेलजवळ सापळा लावून ढमालेला अटक केली होती. त्याच्या घराच्या झडतीत पोलिसांना दहा ते बारा बँक खाती आणि एका बँक लॉकरची माहिती मिळाली होती. पोलिसांनी विद्या सहकारी बँकेच्या बिबवेवाडी शाखेमधील लॉकरची पाहणी केली असता त्यामध्ये तब्बल साडेबाराशे ग्रॅम सोने आढळले. यापूर्वी घरामधून साडेतीनशे ग्रॅम सोने आणि साडे चार लाखांच्या नव्या नोटा हस्तगत केल्या होत्या. नोटाबंदीच्या काळात करबुडवेगिरी करणाऱ्या तसेच मोठ्या रकमांच्या नव्या नोटा बाळगणाऱ्यांवर प्राप्तिकर विभागाकडून कारवाई सुरु आहे. मात्र, आता प्राप्तिकर विभागाचेच अधिकारी जाळ्यात अडकू लागले आहेत. (प्रतिनिधी)