दीड लाखाचे चोरीचे मोबाईल हस्तगत
By Admin | Published: October 11, 2015 09:57 PM2015-10-11T21:57:15+5:302015-10-12T00:31:10+5:30
कऱ्हाडात कारवाई : एकास अटक; तीसहून अधिक मोबाइल जप्त
कऱ्हाड : गर्दीच्या ठिकाणावरून महागडे मोबाइल चोरणाऱ्या चोरट्यास पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. त्याच्याकडून दीड लाखाहून अधिक किमतीचे चोरीचे मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत. कऱ्हाड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने ही कारवाई केली. श्रावण राजेश कांबळे (वय २३, रा. शिक्षक कॉलनी, मलकापूर) असे पोलिसांनी अटक केलेल्या मोबाइल चोरट्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कऱ्हाडातील एका महिलेचा महागडा मोबाइल काही दिवसांपूर्वी चोरीस गेला होता. याबाबतची तक्रार संबंधित महिलेने शहर पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतर वरिष्ठ निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक एच. एन. काकंडकी यांच्या पथकाने तपासाला सुरुवात केली. चोरीस गेलेल्या मोबाइलचे सातारच्या संगणक शाखेच्या माध्यमातून तांत्रिक निरीक्षक केल्यानंतर संबंधित मोबाईल मलकापुरातील एका युवकाकडे असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार पोलिसांनी संबंधित युवकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता संबंधित मोबाइल श्रावण कांबळे याच्याकडून आपण विकत घेतल्याचे त्या युवकाने सांगितले. त्यामुळे पोलिसांनी श्रावणला ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने पोलिसांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, कसून चौकशी केली असता त्याने संबंधित मोबाइल चोरल्याचे कबूल केले. तसेच त्याने अन्य गुन्ह्णांची कबुलीही पोलिसांसमोर दिली. मलकापुरातील शिक्षक कॉलनीत वास्तव्यास असणारा श्रावण कांबळे हा कामानिमित्त पुण्यात वास्तव्यास होता. त्यावेळी साथीदारांच्या मदतीने त्याने
पुण्यात काही मोबाइल चोरले
होते. (प्रतिनिधी)
महागड्या मोबाइलवर लक्ष
गर्दीच्या ठिकाणी गेल्यानंतर श्रावण नागरिकांच्या हातातील मोबाइलवर पाळत ठेवायचा. एखाद्याच्या हातात महागडा मोबाइल दिसला, तर तो त्याचा पाठलाग करायचा. संधी मिळताच संबंधित मोबाइल चोरून तो पसार व्हायचा. संबंधित मोबाईल तो हजार ते दोन हजारांत युवकांना विकायचा, अशी माहिती पोलीस तपासात उघड होत आहे.