दीड महिन्याचा कारभार लाचखोरीत अडकला
By admin | Published: April 8, 2017 08:12 PM2017-04-08T20:12:07+5:302017-04-08T20:12:07+5:30
सेवा खंडित काळातील शिक्षकांचे वेतन काढण्यासाठी चार लाखांची लाच स्वीकारणाऱ्या जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी सविता सिदगोंडा बिरगे
ऑनलाइन लोकमत
नांदेड, दि. 8 - सेवा खंडित काळातील शिक्षकांचे वेतन काढण्यासाठी चार लाखांची लाच स्वीकारणाऱ्या जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी सविता सिदगोंडा बिरगे यांनी अवघ्या दीड महिन्यापूर्वीच माध्यमिक शिक्षणाधिकारी पदाचा प्रभारी कारभार स्वीकारला, मात्र तो लाचखोरीत अडकला.
नांदेड येथे निरंतर शिक्षणाधिकारी पदावर सविता बिरगे यांची २०१२ - १३ मध्ये निवड झाली होती़ त्यापूर्वी बारड येथील जिल्हा परिषद शाळेत माध्यमिक शिक्षिका म्हणून बिरगे कार्यरत होत्या़ या काळात त्यांनी एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली़ त्यांना पहिली सेवा नांदेड येथेच देण्यात आली होती़ त्यानंतर जिल्हा परिषदेतील प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाचा त्यांनी वेळोवेळी प्रभारी पदभार घेतला़
दरम्यान, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी शिवाजी पवार यांची हिंगोली येथे बदली झाल्यानंतर त्यांच्याकडे मागील महिन्यात पदभार सोपविण्यात आला होता़ पुन्हा शिक्षणाधिकाऱ्याचा पदभार काही दिवसांसाठीच असताना लाचखोरीचा ठपका आला. दोन महिला शिक्षकांचे खंडित काळातील १२ लाख ७१ हजार रुपयांचे बील काढण्यासाठी चार लाखांची लाच घेतली. या प्रकारानंतर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात सन्नाटा पसरला. बदली, मान्यता, खंडित सेवा काळातील वेतन, अशा विविध कारणांसाठी व्यवहार सर्वत्र होतो, हे उघड सत्य असल्याचे शिक्षक सांगतात. मात्र पुराव्याअभावी कोणीही दोषी ठरत नाही. घेणार व देणार या दोघांच्या सहमतीने व्यवहार होत असल्याने गैरव्यवहाराची शेकडो प्रकरणे कागदावर येत नाहीत, अशी प्रतिक्रियाही जिल्हा परिषदेत ऐकायला मिळाली.(प्रतिनिधी)