कचऱ्यापासून दररोज दीड मेगावॅट वीजनिर्मिती
By Admin | Published: July 9, 2016 12:59 AM2016-07-09T00:59:41+5:302016-07-09T00:59:41+5:30
महापालिकेने बीओटी तत्त्वावर (बांधा, वापरा, हस्तांतरित करा) राबविलेल्या कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्पातून दररोज दीड मेगावॅट वीजनिर्मिती होत आहे. राज्यातील हा एकमेव पथदर्शी
सोलापूर : महापालिकेने बीओटी तत्त्वावर (बांधा, वापरा, हस्तांतरित करा) राबविलेल्या कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्पातून दररोज दीड मेगावॅट वीजनिर्मिती होत आहे. राज्यातील हा एकमेव पथदर्शी प्रकल्प आहे.
सोलापूर महापालिकेने २00८ मध्ये मुंबईतील आॅरगॅनिक्स रिसायकलिंग सीस्टिम प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला कचऱ्यापासून वीजनिर्मितीचा प्रकल्प राबविण्यास परवानगी मिळाली. सध्या येथून तीन वर्षांपासून दररोज एक ते दीड वॅट वीजनिर्मिती यशस्वीपणे सुरू झाली आहे. सरव्यवस्थापक राम माथूर व तांत्रिक व्यवस्थापक राजीव यादव यांनी प्रकल्पाविषयी माहिती दिली. ३ मेगावॅट वीज प्रकल्पासाठी दररोज ४00 टन ओला व सुका कचरा आवश्यक आहे, पण महापालिकेच्या यंत्रणेकडून दररोज दीडशे-दोनशे टन कचरा उपलब्ध केला जातो. पहिल्या टप्प्यात या कचऱ्यातून दगड, माती, कापड, प्लास्टिक पिशव्या बाहेर काढल्या जातात. दुसऱ्या टप्प्यातही ही विलगीकरण प्रक्रिया पार पाडली जाते. त्यानंतर, तिसऱ्या टप्प्यात कचरा बारीक करून चाळणीद्वारे दोन भाग केले जातात. त्यात एकदम बारीक झालेला कचरा गॅस टाकीत नेला जातो, तर दुसरा भाग खतनिर्मिती विभागात जमा केला जातो. (प्रतिनिधी)
कंपोस्ट खताची निर्मिती..
कचऱ्यापासून गॅसनिर्मितीबरोबरच उत्तम प्रकारचे कंपोस्ट खत बनते. झुआरी कंपनी हे खत खरेदी करीत आहे. याशिवाय तीन हजार रुपये टनाप्रमाणे शेतकऱ्यांनाही थेट हे खत खरेदी करता येते.