भिडेंसह एकबोटेंना अद्याप क्लीन चिट दिलेली नाही- दीपक केसरकर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2018 09:02 PM2018-01-12T21:02:27+5:302018-01-12T23:49:25+5:30
कोेरेगाव-भीमा दंगलप्रकरणी संभाजी भिडे गुरुजी व मिलिंद एकबोटे यांना अद्याप क्लीन चिट दिलेली नसून गुन्हा नोंदविण्यात आले आहेत. त्यांची अद्याप चौकशी सुरू आहे. मी कुठेही क्लीन चिटबाबत बोललो नाही, असे मत राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केले, ते सावंतवाडी येथे बोलत होते.
सावंतवाडी : कोेरेगाव-भीमा दंगलप्रकरणी संभाजी भिडे गुरुजी व मिलिंद एकबोटे यांना अद्याप क्लीन चिट दिलेली नसून गुन्हा नोंदविण्यात आले आहेत. त्यांची अद्याप चौकशी सुरू आहे. मी कुठेही क्लीन चिटबाबत बोललो नाही, असे मत राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केले, ते सावंतवाडी येथे बोलत होते. कोरेगाव-भीमा दंगलप्रकरणी कोणालाही पाठीशी घालणार नाही. या प्रकरणाची चौकशी योग्य प्रकारे सुरू असून, पोलीस दोषींवर कारवाई करत आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मंत्री केसरकर हे विविध कार्यक्रमांसाठी शुक्रवारी सावंतवाडीत आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांच्या वेगवेगळ्या प्रश्नांना उत्तरे दिली.
मंत्री केसरकर म्हणाले, पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात सुरू असणा-या अनैतिक धंद्यांची जबाबदारी कोणावर सोपवायची याचा गृह विभागाचे अतिरिक्त सचिव यांच्या अध्यक्षतेखालील समिती अभ्यास करीत आहेत. त्याचा अहवाल लवकरच ही समिती सरकारला देईल. त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. सिंधुदुर्गमध्ये पोलिसांच्या गाडीतच अवैध दारू सापडलेल्या घटनेबाबत त्यांनी माहिती दिली.
अवैध बेकायदेशीर धंद्यांविरोधात पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील नेमकी जबाबदारी पोलीस निरीक्षकांवर टाकायची का, याबाबत गृहविभागाचे अतिरिक्त सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती एका महिन्यात अहवाल देणार आहे. त्यानंतर अवैध धंद्यांची जबाबदारी निश्चित केली जाईल. अनैतिक धंदे नियंत्रणात येतील, असा विश्वास गृहराज्यमंत्री केसरकर यांनी व्यक्त केला. जिल्ह्यातील ठेकेदार निविदा भरत नाहीत तसेच खड्ड्यांच्या निविदा भरण्याचे टाळणा-यांचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे अभिमानाने समर्थन करत आहेत. ठेकेदारांनी आपण मोठे झाल्याचे विसरून निविदा भरण्याचे टाळले असल्याने कामे होत नाहीत. अशा ठेकेदारांविरोधात समाजानेच उभे राहायला हवे. जनतेला वेठीस धरणा-यांच्या विरोधात जनता आवाज उठवत नसल्याने त्यांचे फावते, असे मत पालकमंत्री केसरकर यांनी व्यक्त केले.
कोरेगाव-भीमा दंगलीतील संबंधितांवर कारवाई होत आहे. यात आमच्या सरकारचा कोणता ह हस्तक्षेप असणार नाही, पोलीस आपले काम करीत आहेत. ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांना भरपाई देण्याबाबत शासन प्रामाणिक प्रयत्न करेल, असेही मंत्री केसरकर यांनी सांगितले. कोेरेगाव-भीमा दंगलप्रकरणी संभाजी भिडे गुरुजी व मिलिंद एकबोटे यांना अद्याप क्लीन चिट दिलेली नाही. गुन्हा नोंदविण्यात आल्यावर चौकशी सुरू असल्याचे मी म्हटले होते, असे गृहराज्यमंत्री केसरकर म्हणाले. भिडे गुरुजींचे वय ८४ असून गडकोट दुरुस्तीसाठी ते झटताहेत, त्यामुळे त्यांचे कार्यही महत्त्वाचे आहे.
पण मराठा समाजाने माझे अभिनंदन केले नाही
सिंधुदुर्ग जिल्हा मराठा समाजाच्या मोर्चास आमच्या खासदार, आमदारांसह मी सहकार्य केले होते. मी गृहराज्यमंत्री असल्याने नैतिकता पाळली. त्यामुळे या मोर्चात सामील झालो नव्हतो. कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा झाली. तेव्हा माझे अभिनंदन मात्र मराठा समाजाने केले नाही, अशी खंत गृहराज्यमंत्री केसरकर यांनी यावेळी बोलून दाखवली. माझ्या मतदारसंघातील शिवसेनेचे बहुतेक सर्व पदाधिकारी मराठाच आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.