एक कोटी कुटुंबांपर्यंत लाभ पोहोचविणार; मुख्यमंत्र्यांची ‘लाडकी बहीण कुटुंब भेट’ सुरु
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2024 10:06 AM2024-09-11T10:06:39+5:302024-09-11T10:07:58+5:30
मुख्यमंत्री लाडकी योजनेबाबत लावलेल्या बॅनरवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो नाही याबाबत विचारले असता शिंदे म्हणाले की, ही श्रेयवादाची लढाई नाही. आम्ही सरकार म्हणून काम करतोय.
ठाणे - मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सक्षम करण्यासाठी आम्ही कुटुंब अभियान राबवत आहोत. योजनेच्या यशस्वितेसाठी, महायुतीच्या विजयासाठी शिवसैनिक घरोघरी जातील, मी आजपासून त्याची सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात एक लाख शिवसैनिक रोज १५ घरांपर्यंत अशा पद्धतीने एक कोटी घरांपर्यंत पोहोचून त्यांना लाभ मिळाला की नाही, याची तपासणी करतील. लाभ मिळाला नसेल तर मार्गदर्शन करतील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी ठाण्यात व्यक्त केला.
‘लेक लाडकी लक्ष्मी’, ‘मुख्यमंत्री कार्य युवा प्रशिक्षण योजना’, ‘मुलींचे उच्च शिक्षण मोफत’, ‘शेतकऱ्यांचे विज बिल माफ’ अशा अनेक योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मिळाला पाहिजे म्हणून ‘शासन आपल्या दारी’ हे अभियान यशस्वी झाले. ही योजना पाच कोटी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचली. एक कोटी ६० लाख लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले. सगळ्या लाभार्थ्यांना लाडकी बहीण आणि इतर योजनांचा लाभ मिळाला पाहिजे, सरकारी योजना त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत म्हणून शिवसैनिक कुटुंब भेटी देऊन मार्गदर्शन करतील. कुटुंबाच्या इतर अडचणी सोडवतील. आठवडाभरात एक कोटी घरापर्यंत आमचे कार्यकर्ते पोहोचतील, याचा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी केला. मुख्यमंत्री लाडकी योजनेबाबत लावलेल्या बॅनरवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो नाही याबाबत विचारले असता शिंदे म्हणाले की, ही श्रेयवादाची लढाई नाही. आम्ही सरकार म्हणून काम करतोय.
आमच्या सरकारला किती गुण देणार?
मुख्यमंत्र्यांनी शहरातील १५ घरांना भेट देऊन लाडक्या बहिणींशी संवाद साधला. लाडकी बहीण योजना सुरू राहावी असे तुम्हाला वाटते का? आमच्या सरकारने कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचा विचार करून प्रत्येक व्यक्तीसाठी योजना सुरू केल्या. या योजनांचा तुम्हाला फायदा मिळाला पाहिजे. या योजना तुम्हाला समजावून सांगण्यासाठी मी तुमच्या घरी आलो आहोत. तुम्ही इतर बहिणींना या योजनेची माहिती द्या. आमच्या सरकारला तुम्ही किती गुण देणार, असा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींना विचारला. यावेळी आपल्या या भावाला पैकीच्या पैकी गुण देणार, असे या महिला उत्तरल्या.