साहित्य संमेलनासाठी एक कोटींचा निधी अशक्यच
By Admin | Published: January 16, 2017 03:18 AM2017-01-16T03:18:27+5:302017-01-16T03:18:27+5:30
साहित्य संमेलनाला सध्या मिळणारा २५ लाखांचा सरकारी निधी वाढवून एक कोटी रुपये करण्याच्या मागणीबाबत सरकार सकारात्मक आहे.
जान्हवी मोर्ये,
डोंबिवली- साहित्य संमेलनाला सध्या मिळणारा २५ लाखांचा सरकारी निधी वाढवून एक कोटी रुपये करण्याच्या मागणीबाबत सरकारकडून सकारात्मक विचार सुरू असल्याची ग्वाही सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी ‘लोकमत’कडे दिली. मात्र, नोटाबंदी व निवडणूक आचारसंहितेमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या डोंबिवलीमधील साहित्य संमेलनास तावडे यांच्या घोषणेचा लागलीच लाभ होण्याची शक्यता दिसत नाही. अर्थात, संमेलनासाठी निधी कमी पडू देणार नाही, या तावडे यांच्या हमीवर आयोजकांची भिस्त राहणार आहे. ९० व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठी राज्य सरकारकडून मिळणारा २५ लाखांचा निधी अपुरा असून तो वाढवून एक कोटी रुपये करण्याची मागणी आयोजक आगरी युथ फोरमने केली आहे. याबाबत, तावडे यांना विचारले असता निधी वाढवून एक कोटी रुपये करण्याच्या मागणीचा राज्य सरकार गांभीर्याने विचार करीत आहे. मात्र, वाढीव निधी सरकारने दिला, तरी तो डोंबिवलीतील साहित्य संमेलनास नव्हे तर पुढील साहित्य संमेलनास मिळण्याची शक्यता आहे.
संमेलनास गेल्या २० वर्षांपासून २५ लाखांचा निधी राज्य सरकारकडून दिला जात आहे. महागाई वाढल्याने निधी कमी पडत आहे. राज्याचा अर्थसंकल्प हजारो कोटी रुपयांचा आहे. ठाण्यात फेब्रुवारी २०१६ मध्ये अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन पार पडले. या संमेलनासही राज्य सरकारकडून २५ लाख रुपयांचाच निधी मिळाला. नाट्य संमेलनाध्यक्ष गंगाराम गवाणकर यांनी हा निधी दुप्पट करून ५० लाख रुपये करण्याची मागणी केली होती. त्यामुळे साहित्य संमेलनास मिळणारा निधी १ कोटी रुपये करण्याची मागणी आहे. तावडे म्हणाले की, पिंपरी-चिंचवड येथील संमेलनाच्या आयोजनात डी.वाय. पाटील यांचा पुढाकार होता. त्यांनी राज्य सरकारकडून मिळणारा निधी सरकारला देणगी स्वरूपात परत केला. ही चांगली बाब असली तरी निधीची रक्कम वाढवण्यासंदर्भात सकारात्मक विचार केला जाईल. राज्य सरकारकडून संमेलनास काही कमी पडू दिले जाणार नाही. मात्र, अ.भा. मराठी साहित्य महामंडळाच्या पदाधिकारी उज्ज्वला मेहंदळे यांनी सांगितले की, सरकारने निधी वाढवून देण्याचा निर्णय घेतला तरी त्याची अंमलबजावणी डोंबिवलीतील संमेलनापासून होणार नाही. वाढीव निधी पुढील संमेलनाला मिळेल.
>‘संमेलनात सहभागी शिक्षकांना भरपगारी रजा’
संमेलनात मराठी भाषा शिकवणारे शिक्षक सहभागी होणार असल्याने राज्यातील मराठी शाळांना संमेलनाच्या तीन दिवसांच्या कालावधीत सुटी देण्याची मागणी स्वागताध्यक्ष वझे यांनी केली असल्याकडे मंत्री तावडे यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, संमेलनात सहभागी होणाऱ्या शिक्षकांची सुटी ही भरपगारी असेल. राज्यभरातील जवळपास ५०० शिक्षक साहित्य संमेलनात सहभागी होणे अपेक्षित आहे.