शेतकऱ्यांचा एक कोटी रुपयांचा संत्रा दलालाने परस्पर विकला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 11:52 AM2021-01-17T11:52:16+5:302021-01-17T11:52:29+5:30
Crime News दलालाची थातूरमातूर चौकशी करण्यापलीकडे पोलिसांनी काहीच केले नाही, असे संबंधित शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यातील मुंगळा (ता. मालेगाव) येथील शेतकऱ्यांनी लॉकडाऊनपूर्वी हैदराबाद येथील कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवलेला सुमारे एक कोटी रुपये किमतीचा संत्रा संबंधित दलालाने परस्पर विकला. याप्रकरणी आठ शेतकऱ्यांनी तीन महिन्यांपूर्वी मालेगाव पोलिसांत तक्रार दाखल केली होती, मात्र फक्त एकवेळ शेतकऱ्यांसोबत जाऊन दलालाची थातूरमातूर चौकशी करण्यापलीकडे पोलिसांनी काहीच केले नाही, असे संबंधित शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
कोरोना विषाणू संसर्गाचे संकट उद्भवण्यापूर्वी वाशिम जिल्ह्यातील मुंगळा (ता. मालेगाव) येथील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी दलालाच्या माध्यमातून हैदराबाद येथील कोल्ड स्टोरेजमध्ये २० हजार ८७७ क्रेटमध्ये ४६८९.६३ क्विंटल आणि वडोदरा (गुजरात) येथील कोल्ड स्टोरेजमध्ये ६५० क्रेटमध्ये १४३ क्विंटल संत्रा साठवून ठेवला होता.
मार्च महिन्यातील शेवटच्या आठवड्यात कोल्ड स्टोरेजमधून संत्रा काढून तो विक्री करण्याचे नियोजन संबंधित शेतकऱ्यांचे होते; मात्र २५ मार्चपासून देशभरात लॉकडाऊन जाहीर झाल्याने संत्रा कोल्ड स्टोरेजमध्येच अडकून पडला.
कालांतराने कोरोना संकटाची परिस्थिती निवळल्यानंतर शेतकऱ्यांनी संबंधित दलालाकडे संत्र्याची मागणी केली असता, तो मिळाला नाही. याप्रकरणी मुंगळा येथील लक्ष्मण राऊत, महादा राऊत, संतोष मनोहर राऊत, संतोष केळे, संतोष बबन राऊत आणि मोतीराम सोनुने या शेतकऱ्यांनी मालेगाव पोलिसांत तक्रार दाखल करून संबंधित दलालाविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली; परंतु तीन महिने उलटूनही पोलिसांनी कुठलीच विशेष हालचाल केलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमधून रोष व्यक्त होत आहे
हैदराबादच्या पोलीस ठाण्यातही तक्रार
मुंगळा येथील शेतकऱ्यांनी मालेगाव पोलीस ठाण्यासोबतच हैदराबाद येथील ठाण्यातही एक कोटी रुपये किमतीचा संत्रा परस्पर विकणाऱ्या दलालावर कारवाई करण्यासाठी तक्रार दाखल केलेली आहे. असे असले तरी संबंधित दलालावर अद्यापपर्यंत कुठलीही कारवाई झालेली नाही, असे तक्रारकर्ते शेतकरी महादा राऊत यांनी सांगितले.
शेतात अहोरात्र कष्ट करून पिकविलेला संत्रा सुरक्षित राहावा आणि चांगला दर मिळून फायदा व्हावा, या उद्देशाने हैदराबादच्या कोल्ड स्टोरेजमध्ये साठवून ठेवला होता; मात्र तो संबंधित दलालाने परस्पर विकला. याप्रकरणी तीन महिन्यांपूर्वी मालेगाव पोलिसांत तक्रार दाखल करूनही न्याय मिळालेला नाही.
- संतोष गजानन केळे
संत्रा उत्पादक शेतकरी, मुंगळा