अकरावी प्रवेशाला एक दिवसाची मुदतवाढ
By admin | Published: July 14, 2017 05:16 AM2017-07-14T05:16:56+5:302017-07-14T05:16:56+5:30
अकरावीच्या आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेत पहिल्या गुणवत्ता यादीत नावे जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी शुक्रवारी, १४ जुलैला दुपारी १२ वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अकरावीच्या आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेत पहिल्या गुणवत्ता यादीत नावे जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी शुक्रवारी, १४ जुलैला दुपारी १२ वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. शिक्षण उपसंचालक कार्यालयाने गुरुवारी हा निर्णय जाहीर केला. मात्र, अकरावीच्या पुढील वेळापत्रकात कोणताही बदल केला नसल्याची माहिती शिक्षण उपसंचालक बी. बी. चव्हाण यांनी दिली आहे.
चव्हाण यांनी सांगितले की, मुंबईतील आॅनलाइन प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी सोमवारी सायंकाळी ५ वाजता जाहीर होणार होती. मात्र, तांत्रिक कारणास्तव यादी मध्यरात्री जाहीर झाली. त्यात काही विद्यार्थ्यांना प्रवेशाचे एसएमएस सकाळी उशिरा पोहोचले. त्यामुळे काही प्रमाणात विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी पुरेसा वेळ मिळाला नसल्याच्या तक्रारी कार्यालयाकडे आल्या होत्या. या तक्रारींचा विचार करून उपसंचालक कार्यालयाने विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी दुपारी १२ वाजेपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. असे असले, तरी प्रवेशाच्या पुढील वेळापत्रकात कोणताही बदल झाला नसून, पुढील प्रवेश प्रक्रिया ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होणार असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले.
याआधी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेसह अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने अकरावी प्रवेशासाठी मुदतवाढ देण्याची मागणी उपसंचालक कार्यालयाकडे केली होती. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. सोबत शुक्रवारी, १४ जुलैला सायंकाळी ५ वाजता अकरावीच्या पहिल्या फेरीचे कटआॅफ व रिक्त जागांचा तपशील प्रवेश प्रक्रियेच्या संकेतस्थळावर जाहीर होणार आहे. तरी विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन उपसंचालक कार्यालयाने केले आहे.