म्हाडाच्या घरांसाठी एकाच दिवसांत तब्बल 81 हजार लोकांनी केली नोंदणी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2020 07:41 PM2020-12-11T19:41:31+5:302020-12-11T20:09:20+5:30
कोरोनानंतर सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणारी ही म्हाडाची सोडत आहे.
पुणे : पुणे, पिंपरी-चिंचवडसह विभागातील सांगली, सोलापूर, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल 5 हजार 657 घरांसाठी पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ (म्हाडा) च्या वतीने ऑनलाईन सोडत काढण्यात येणार आहे. यासाठी गुरूवार (दि.10) पासून ऑनलाईन पध्दतीने अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. संपूर्ण राज्यातून याला चांगला प्रतिसाद मिळत असून, एकाच दिवसांत तब्बल 81 हजार लोकांनी नोंदणी केली असल्याची माहिती म्हाडाचे मुख्य अधिकारी नितीन माने पाटील यांनी दिली.
याबाबत माने पाटील यांनी सांगितले की, कोरोनानंतर सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणारी ही म्हाडाची सोडत आहे. यात म्हाडाचे स्वत :च्या घरासह तब्बल 48 नामांकित बांधकाम व्यावसायिकांकडून म्हाडाला 20 टक्क्यांमध्ये दिलेल्या 1 हजार 430 घराचा समावेश असल्याचे माने पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यासाठी 11 जानेवारी 2021 पर्यंत अर्ज स्वीकारणार येणार आहेत. यामुळेच जास्तीत जास्त इच्छूकांनी 11 जानेवारी 2021 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत https://lottery.mhada.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज नोंदणी करावी, असे आवाहन माने पाटील यांनी केले आहे.