Death of Sun: Death of Sun: सूर्य आपलं अर्धं आयुष्य जगलाय; एक दिवस त्याचा मृत्यू हाेणार, मग इतर ग्रहांचे काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2022 09:06 AM2022-01-03T09:06:28+5:302022-01-03T10:06:35+5:30
सध्या ५ अब्ज वर्षे पुरेल एवढे इंधन शिल्लक. रमन विज्ञान केंद्राचे खगाेलीय शिक्षक महेंद्र वाघ यांनी याबाबत खगाेलशास्त्रज्ञांनी मांडलेल्या अभ्यासावर प्रकाश टाकला.
- निशांत वानखेडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सूर्याशिवाय आपण पृथ्वीवरील जीवसृष्टीची कल्पनाही करू शकत नाही. पृथ्वीच नाही तर अख्खे साैरमंडळ त्या विशाल ताऱ्यावर अवलंबून आहे. पण हा सूर्यच मृत झाला तर? होय, एक ना एक दिवस सूर्याचाही अंत हाेणारच आहे. मात्र, आताच काळजी नको. साडेचार-पाच अब्ज वर्षांनंतर जे अस्तित्वात असतील, त्यांना मात्र काळजी करावी लागेल. सध्या सूर्यात ५ अब्ज वर्षे पुरेल एवढे इंधन नक्कीच शिल्लक आहे.
ताऱ्यांचे आयुष्य मर्यादित असते, तसे सूर्याचेही आहे. सूर्य आणि त्याचे साैरमंडळ तयार होण्याच्या प्रक्रियेला शास्त्रज्ञांच्या अभ्यासानुसार ४.५ अब्ज वर्षे झाली आहेत. आजच्या घडीला सूर्य व त्याची ग्रहमाला स्थिर टप्प्यात आहे. मात्र, खगाेलशास्त्रज्ञांच्या मते आपल्या सूर्याचे वय १० अब्ज वर्षाचे आहे आणि आता ताे आपले अर्धे आयुष्य जगला आहे.
रमन विज्ञान केंद्राचे खगाेलीय शिक्षक महेंद्र वाघ यांनी याबाबत खगाेलशास्त्रज्ञांनी मांडलेल्या अभ्यासावर प्रकाश टाकला. सूर्याच्या काेरमध्ये एकदा सर्व हायड्रोजन वापरला गेला की, सूर्य या स्थिर अवस्थेतून बाहेर पडेल. कोरमध्ये हायड्रोजन शिल्लक नसल्यामुळे ऊर्जा तयार करू शकणार नाही आणि स्वत:च्या वजनानेच काेसळायला सुरुवात हाेईल. हा गोळा काेसळताना असलेल्या दबावामुळे प्रचंड ऊर्जा निर्माण हाेईल आणि आकारमान लाल राक्षस वाटावा इतके विशाल हाेईल. सूर्याचा बाह्य थर जवळपास १७० दशलक्ष किलाेमीटरपर्यंत पसरेल, असा अंदाज आहे. ही प्रक्रिया ५ दशलक्ष वर्षे चालेल. सूर्याजवळ असलेले बुध आणि शुक्र ग्रह त्यात सामावून नष्ट हाेतील.
सूर्य श्वेत ग्रहाप्रमाणे होईल
बाहेरील गाभ्यामधील हायड्रोजन कमी होईल आणि भरपूर हेलियम शिल्लक राहील. तो घटक नंतर ऑक्सिजन आणि कार्बनसारख्या जड घटकांमध्ये मिसळेल. यातून जास्त ऊर्जा उत्सर्जित होत नाही. एकदा सर्व हेलियम नाहीसे झाले की सूर्य एका पांढऱ्या संकुचित ग्रहाप्रमाणे होईल. त्याचा आकार बुध ग्रहापेक्षा कमी असेल. सर्व बाह्य पदार्थ नष्ट होतील आणि तेजाेमय श्वेत बटू शिल्लक राहील.
पृथ्वीचे काय हाेईल?
nसूर्य राक्षसी आकाराएवढा वाढला की बुध व शुक्राप्रमाणे पृथ्वीसुद्धा त्यात सामावून जाईल, असा एक अंदाज आहे.
nपृथ्वीचे तापमान प्रचंड वाढेल आणि संपूर्ण पाण्याचे बाष्पीभवन हाेईल. पाण्यातील हायड्राेजन व ऑक्सिजन खंडित हाेतील. हायड्राेजन अंतराळात उडेल व ऑक्सिजनची प्रक्रिया हाेईल, अशी दुसरी शक्यता आहे.
nपृथ्वीवर केवळ कार्बनडाय ऑक्साईड व नायट्राेजन हे प्रमुख घटक असतील. आज शुक्र ज्या अवस्थेत आहे, तशी पृथ्वीची अवस्था हाेईल.