शिक्षकांचा आठवड्यातील एक दिवस आता अंगणवाडीत! प्राथमिक शिक्षकांचे मार्गदर्शन मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2017 02:23 AM2017-09-06T02:23:13+5:302017-09-06T02:23:24+5:30
अंगणवाडी केंद्राजवळील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षकांना आता आठवड्यातून किमान एक दिवस अंगणवाडी केंद्राला भेट देऊन पूर्व बालशिक्षण व संगोपन या विषयावर लक्ष केंद्रित करावे लागणार आहे.
संतोष वानखडे
वाशिम : अंगणवाडी केंद्राजवळील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षकांना आता आठवड्यातून किमान एक दिवस अंगणवाडी केंद्राला भेट देऊन पूर्व बालशिक्षण व संगोपन या विषयावर लक्ष केंद्रित करावे लागणार आहे.
३ ते ६ वर्षे वयोगटातील बालकांना पूर्व प्राथमिक शिक्षण मिळावे म्हणून अंगणवाडी केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. येथे पूर्व प्राथमिक शिक्षणाचे धडे दिले जातात.
अंगणवाडीतील बालकांना प्राथमिक शिक्षणाची ओळख व्हावी, पहिल्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी मुले शैक्षणिकदृष्ट्या परिपक्व व्हावी, यासाठी आता जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांना आठवड्यातील एक दिवस अंगणवाडीतील बालकांसाठी द्यावा लागणार आहे. अंगणवाडी केंद्रातील बालकांसाठी विद्या प्राधिकरण पुणे यांच्या समन्वयाने पूर्व शालेय शिक्षणासाठी आकार अभ्यासक्रम विकसित करण्यात आला आहे. हा अभ्यासक्रम शिकविण्यासाठी अंगणवाडी सेविकांना स्थानिक पातळीवरील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षकांची मदत घ्यावी लागणार आहे.
यादृष्टीने प्राथमिक शिक्षकांनी अंगणवाडी सेविकेला प्राथमिक शिक्षण स्तरावरील शैक्षणिक गरजा विचारात घेऊन मार्गदर्शन करावे, अशा सूचना शिक्षण विभागाने दिलेल्या आहेत.
आठवड्यातून किमान एक दिवस अंगणवाडी केंद्राला भेट देऊन पूर्व बालशिक्षण व संगोपन या विषयावर लक्ष केंद्रित करून संबंधित अंगणवाडी सेविकेला मार्गदर्शन करावे लागणार आहे.
शाळेत साजरे होणारे विविध उत्सव, समारंभ, १५ आॅगस्ट, २६ जानेवारी आदी कार्यक्रमांच्या वेळी अंगणवाडीतील मुलांना बोलावून त्यांना या कार्यक्रमात सहभागी करून घ्यावे लागणार आहे. प्रत्येक वर्षी वार्षिक परीक्षा संपल्यानंतर अंगणवाडी केंद्रामधील ३ ते ४ वर्षे, ४ ते ५ वर्षे व ५ ते ६ वर्षे या वयोगटाप्रमाणे आकार अभ्यासक्रम पूर्ण केल्याबाबतची खात्री अंगणवाडी केंद्राजवळील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांना करावी लागणार आहे.
‘आकार अभ्यासक्रम’ पूर्ण करणाºया मुलांना शिक्षक व अंगणवाडी सेविका यांच्या संयुक्त स्वाक्षरीचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे. त्यानंतर या मुलांना पहिल्या वर्गात सहजपणे प्रवेश मिळणार आहे.