५० हजारांसाठी कायपण! बायको मेली एकाची अन् हक्क गाजवताहेत तिघेजण, नेमका काय प्रकार?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 11:57 AM2022-02-18T11:57:47+5:302022-02-18T11:58:07+5:30
कोरोनाने मृत्यू झालेल्यांच्या ५० हजारांच्या अनुदानासाठी तीन तीन अर्ज
सोमनाथ खताळ
बीड : कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना ५० हजार रुपये सानुग्रह अनुदान दिले जात आहे. जिल्हा रुग्णालय व जिल्हाधिकारी कार्यालयातून या अर्जांची खात्री व छाननी केली जात आहे. कोरोनामुळे एका महिलेचा मृत्यू झाला. परंतु ५० हजार रुपये मिळावेत, म्हणून ही आपलीच बायको होती, असे नाते टाकून तिघे तिघे हक्क गाजवत असल्याची धक्कादायक उदाहरणे समोर आली आहेत. परंतु नावातील फरक व नाते जुळत नसल्याने प्रशासनाने हे अर्ज नाकारल्याचे सूत्रांकडून समजते.
कोरोनामुळे आतापर्यंत २ हजार ९६८ रुग्णांचा जीव गेला आहे. यात अनेकांच्या कुटुंबातील कर्ते पुरूष, महिला आहेत. अनेकांचे आई-वडील दोघेही या कोरोनाने हिरावून घेतले. काहींचे मुलगे, मुली आणि इतर नातेवाईकांचा कोरोनाने जीव घेतला. याच अनुषंगाने शासनाने मृतांच्या जवळच्या नातेवाईकांना ५० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा केली. त्याप्रमाणे जिल्ह्यात आतापर्यंत ३ हजार ३२६ अर्ज प्राप्त झाले आहेत. यातील २ हजार ११७ अर्ज बरोबर असल्याने त्यांना अनुदान देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शासनाला प्रस्ताव दिला आहे. लवकरच त्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा होणार असल्याचे सांगण्यात आले.
...या कारणांमुळे नाकारले अर्ज
जे अर्ज नाकारले त्यात मुख्य कारण हे मृत्यूचे कारण अस्पष्ट असणे हे आहे. तसेच कोरोना पॉझिटिव्हचा अहवाल नसणे, कोरोनामुक्त होऊन दोन महिन्यांनंतर मृत्यू होणे, नाते न जुळणे, एकासाठी तीन तीन अर्ज येणे अशा विविध कारणांसाठी हे अर्ज नाकारल्याचे सांगण्यात आले.
आतापर्यंत जिल्ह्यातील २,११७ जणांचे अर्ज सानुग्रह अनुदानासाठी पात्र ठरले असून, तसा अहवाल शासनाला दिला आहे. १,०८७ अर्ज वेगवेगळ्या कारणाने नाकारले आहेत. - संताेष राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी, बीड
आमच्याकडे अर्ज येताच पॉझिटिव्ह, मृत्यू, नाते आदींची तपासणी केली जाते. तसेच ज्यांच्या अर्जात अडचणी आहेत, त्यांना एक तारीख देऊन समितीसमोर बोलावून घेतले जाते. येथे कागदपत्रांची पुन्हा तपासणी करून अर्जावर निर्णय घेतला जातो. - डॉ. सुरेश साबळे, जिल्हा शल्य चिकित्सक, बीड