एकच चर्चा, मराठा मोर्चा! : मराठा क्रांतीसाठी राजधानी सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2017 05:17 AM2017-08-09T05:17:33+5:302017-08-09T05:18:45+5:30

आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी मराठा समाजाचा ऐतिहासिक असा मूकमोर्चा बुधवारी मुंबईत निघणार असून या मराठा क्रांतीमोर्चासाठी अवघी मुंबापुरी सज्ज झाली आहे.

 One discussion, Maratha Morcha! : Prepare the capital for the Maratha Revolution | एकच चर्चा, मराठा मोर्चा! : मराठा क्रांतीसाठी राजधानी सज्ज

एकच चर्चा, मराठा मोर्चा! : मराठा क्रांतीसाठी राजधानी सज्ज

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी मराठा समाजाचा ऐतिहासिक असा मूकमोर्चा बुधवारी मुंबईत निघणार असून या मराठा क्रांतीमोर्चासाठी अवघी मुंबापुरी सज्ज झाली आहे.
सकाळी ११ वाजता भायखळा येथील राणीबागेहून निघणारा मराठा क्रांती मोर्चा अण्णासाहेब पाटील पूल, खडापारसी, इस्माईल मर्चंट चौक, जे. जे. उड्डाणपूलमार्गे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ओलांडून आझाद मैदानात विसर्जित होईल. मोर्चेकरांच्या मागण्यांबाबत सर्वपक्षीय आमदार मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. या चर्चेतून आलेला निर्णय मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांसमोर मांडला जाईल, असे सूत्रांनी स्पष्ट केले.
राज्यभरातून लाखो मोर्चेकरी मुंबईत दाखल होत आहेत. त्यामुळे ‘एकच चर्चा, मराठा मोर्चा’ असे वातावरण निर्माण झाले आहे. समन्वय समितीने मोर्चाचे सुयोग्य नियोजन केले आहे. आंदोलकांच्या चहा-नाश्तापासून पिण्याचे पाणी, शौचालय, आदी सोयींसह मार्गदर्शनासाठी ६ हजार स्वयंसेवक सज्ज आहेत. त्यांना विशेष टी-शर्ट आणि ओळखपत्रे वितरित करण्यात आली आहेत.

शाळांना सुटी : दक्षिण मुंबईतील शाळा बंदचा निर्णय घेण्यात आला आहे.
२० हजार पोलीस
मोर्चासाठी २० हजार पोलिसांचा फौजफाटा रस्त्यावर उतरणार आहे. पोलीस आयुक्त दत्ता पडसळगीकर यांच्यासह पाचही सहआयुक्तही तिथे असतील.
जड वाहनांना बंदी
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर गुरूवारी सकाळपर्यंत जड वाहनांना बंदी आहे.

चेंबूरपासून वळवा वाहने
भायखळ्यापर्यंत पोहोचण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वय समितीने, चेंबूर सर्कलपासूनच सर्व वाहनांना वळण दिले आहे. मोर्चात सामील होण्यासाठी येणारी वाहने चेंबूर सर्कलपासून वळण घेऊन बीपीटी सिमेंट यार्डच्या दिशेने रवाना होतील. तिथून अवघ्या एक किलोमीटरवर कॉटनग्रीन किंवा रे रोड मार्गे मोर्चाच्या ठिकाणी जाता येणार आहे.

‘दादर ते जे.जे. अन्य वाहनांना बंद’
डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडवरील दादर फायर ब्रिगेड जंक्शन ते जे.जे. उड्डाणपूल ज्या ठिकाणी सुरू होतो, त्या ठिकाणापर्यंत दक्षिण वाहिनी सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहतील. जे.जे. उड्डाणपुलावरून सीएसटीएम जंक्शनपर्यंत दक्षिण व उत्तर मार्ग वाहतुकीसाठी बंद असतील.

प्रश्न तत्काळ सोडवा : राणे
मराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित असला तरी तिथे प्रतिज्ञापत्र सादर करताना राज्य सरकारने मराठा समाजाची ठाम भूमिका मांडावी. आरक्षणाचा प्रश्न तत्काळ सोडवावा, म्हणजे मोर्चे काढण्याची वेळ या समाजावर येणार नाही, असे मत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केले.

वैद्यकीय सुविधा सज्ज
छत्रपती शिवाजी महाराज मेडिकोस असोसिएशन (मराठा मेडिकोस असोसिएशन)चे डॉक्टर्स मोर्चातील आंदोलकांना वैद्यकीय सुविधा पुरवण्यासाठी सज्ज आहेत. त्यासाठी सर्व डॉक्टर्सना चार ते पाच गटांत विभागले आहे.

Web Title:  One discussion, Maratha Morcha! : Prepare the capital for the Maratha Revolution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.