फडणवीसांचा एक पाय गोव्यात एक महाराष्ट्रात; मेहनतीला मिळाले विजयाचे फळ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2022 10:30 AM2022-03-11T10:30:59+5:302022-03-11T10:31:19+5:30

राज्यातील भाजपचे पहिले मुख्यमंत्री हा मान फडणवीस यांच्या नावावर आहे. त्यावेळी ते प्रदेशाध्यक्ष होते. मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तरप्रदेश, गोवा अशा अनेक राज्यात विविध निवडणुकांमध्ये यापूर्वी त्यांनी प्रचाराची धुरा सांभाळली आहे.

One foot of Devendra Fadnavis in Goa and one in Maharashtra | फडणवीसांचा एक पाय गोव्यात एक महाराष्ट्रात; मेहनतीला मिळाले विजयाचे फळ

फडणवीसांचा एक पाय गोव्यात एक महाराष्ट्रात; मेहनतीला मिळाले विजयाचे फळ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर पहिल्या इतकीच नजर ठेवत गोव्यातील विधानसभा निवडणुकीचे भाजपचे प्रभारी म्हणून विधानसभेचे वि२ोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जबाबदारी स्वीकारली. एक पाय महाराष्ट्रात, एक पाय गोव्यात अशी कसरत साधत त्यांनी भाजपला गोव्यात जोरदार विजय मिळवून दिला.

राज्यातील भाजपचे पहिले मुख्यमंत्री हा मान फडणवीस यांच्या नावावर आहे. त्यावेळी ते प्रदेशाध्यक्ष होते. मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तरप्रदेश, गोवा अशा अनेक राज्यात विविध निवडणुकांमध्ये यापूर्वी त्यांनी प्रचाराची धुरा सांभाळली आहे. स्वतंत्र प्रभारी म्हणून पहिली जबाबदारी त्यांच्यावर पहिल्यांदा बिहारच्या निवडणुकीची जबाबदारी आली. त्या राज्यात भाजपाच्या जागांमध्ये मोठी वाढ झाली आणि नितीशकुमार यांच्या नेतृत्त्वात सरकार स्थापन झाले. कोरोना झाल्याने त्यांना  काही दिवस आधी मुंबईत भरती व्हावे लागले होते.

गोव्यामध्ये पूर्वी तीन निवडणुकांत त्यांनी प्रचार केलेला होता. त्यामुळे गोव्याच्या राजकारणाचा अंदाज आणि तेथील गावोगावची माहिती त्यांना होती. मनोहर पर्रिकर हयात नसतानाची ही पहिली विधानसभा निवडणूक होती आणि सत्ता पुन्हा मिळविण्याचे आव्हान होते. त्यांचे पुत्र उत्पल पर्रिकर यांची बंडखोरी शमावी म्हणून फडणवीस यांनी केलेल्या शिष्टाईला यश आले नाही. सामाजिक समीकरणांची जुळवाजुळव, नेत्यांपासून कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी, प्रचार, प्रचाराचे नियोजन अशा अनेक गोष्टींवर लक्ष केंद्रित केले. 

विजय खेचून आणला 
फडणवीस यांनी गोव्याचे प्रभारीपद मिळताच तेथील उमेदवार निश्चिती, सामाजिक समीकरणांची जुळवाजुळव, नेत्यांपासून कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी, इत्यादींवर लक्ष केंद्रित केले. भाजपाविरोधी लाट आहे, मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कमकुवत आहे, अशी वातावरण निर्मिती केली जात होती, तेथे कार्यकर्त्यांची एकत्रित मोट बांधून अशक्यप्राय विजय फडणवीस यांनी खेचून आणला त्यामुळे भाजपमध्ये त्यांचे वजन वाढले आहे.

पर्रीकर यांच्या पुत्राचा थोडक्यात पराभव
साऱ्या देशाचे लक्ष वेधून घेतलेल्या राजधानी शहर पणजीतील बाबूश मोन्सेरात विरुद्ध उत्पल यांच्यात झालेल्या अटीतटीच्या लढतीत बाबूश मोन्सेरात केवळ ७१६ मतांनी विजयी ठरले. पर्रीकरपुत्रांना भाजपने तिकीट नाकारल्यामुळे तो देशभर चर्चेचा विषय ठरला होता.

Web Title: One foot of Devendra Fadnavis in Goa and one in Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.