रायगडच्या आंब्याची चव चाखण्यासाठी करावी लागणार दोन महिने प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2022 06:10 AM2022-12-08T06:10:24+5:302022-12-08T06:10:44+5:30

वातावरणातील बदलाने पालवी फुटण्यास विलंब

One has to wait for two months to taste the taste of Raigad mangoes | रायगडच्या आंब्याची चव चाखण्यासाठी करावी लागणार दोन महिने प्रतीक्षा

रायगडच्या आंब्याची चव चाखण्यासाठी करावी लागणार दोन महिने प्रतीक्षा

Next

राजेश भोस्तेकर 

अलिबाग : फळांचा राजा असलेल्या हापूस आंब्यांची पहिली पेटी बाजारात जाण्याच्या रायगडच्या अनेक वर्षांच्या परंपरेला यंदा मात्र खंड पडणार आहे. थंडीचा हंगाम लांबण्याबरोबरच आंब्यांच्या झाडांना पालवी फुटण्यास विलंब झाला आहे. वातावरणातील बदलामुळे यावर्षी किमान दोन महिने आंब्याचे पीक लांबणीवर पडणार आहे, त्याचबरोबर उत्पादनातही मोठी घट होण्याची शक्यता जाणकारांकडून सांगण्यात आले. गेल्यावर्षी २५ जानेवारीला आंब्याची पहिली पेटी बाजारात आली होती. 

दरवर्षी थंडी  सुरू होण्यापूर्वी आंब्याला मोहोर येण्यास सुरुवात होते. जानेवारीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात रायगडचा आंबा बाजारात येत असतो. सर्वात पहिल्यांदा रायगडमधील पेटी वाशीच्या बाजारात पोहोचते. त्यानंतर रत्नागिरी व अन्य ठिकाणचा मालाची आवक होते. यंदा  मात्र  खवय्यांना  रायगडच्या आंब्याची चव  उशिरा चाखावयास मिळणार आहे. फळ, शेती ही निसर्गाच्या चक्रावर चालणारा व्यवसाय आहे. पूर्वी प्रत्येक ऋतूचक्र वेळेत होत होते. मात्र आताच्या काळात प्रत्येक ऋतूच्या चक्रात बदल झाला आहे. 

बदलत्या ऋतूचा फटका
पावसाळ्यात कडक ऊन, उन्हात पाऊस, तर थंडीत उन्हाळा असे ऋतू बदलत आहेत. या बदलत्या चक्राचा मोठा फटका  शेती व्यवसायाला बसला आहे.  आता थंडीही लाबल्यामुळे आंबाच्या पिकाचे नुकसान होण्याची भीती आहे. नोव्हेंबर महिन्यात योग्य थंडी पडून मोहोर येण्याच्या पोषक काळात वातावरणात बदल झाल्याने आंबा झाडांना वेळेत मोहोर आलेला नाही आहे. 

नोव्हेंबर महिन्यात झाडाला मोठ्या प्रमाणात नवीन पालवी फुटली आहे. त्यामुळे आंब्याच्या झाडांना  मोहर येऊन आंबा पिकून तयार होण्यासाठी सुमारे ३ ते ४ महिन्यांचा कालावधी लागतो. त्यामुळे त्यासाठी मार्च, एप्रिल उजाडण्याची शक्यता आहे.  आंबा बाजारात  उशिरा गेल्यास भाव कमी मिळणार असल्याचे उत्पादक धास्तावले आहेत. 

सर्वात प्रथम बाजारपेठेत दाखल होणाऱ्या रायगडचा आंबा  प्रति डझन सरासरी ५ ते ८ हजार रुपयापर्यंत विकला जातो. येथील आंबा हा भारतातच नव्हे तर परदेशातही विक्रीसाठी पाठवला जात असून, त्यातून कोट्यवधींची उलाढाल होते. यंदा मात्र  आंबा पिकांचे गणित बिघडल्याने उत्पादकांची चिंता वाढली आहे. आंबा उशिरा गेल्यानंतर ग्राहकांकडून त्याला उठाव मिळेल का हा प्रश्नही उत्पादकांना सतावू लागला आहे.

झाडांना आता पालवी फुटू लागली  असून  वातावरणातील बदलामुळे मोहरही उशिरा येईल. त्यामुळे यंदा आंबा पिकविण्यासाठी वेळ लागणार. बदललेल्या वातावरणामुळे आंब्याला कीड लागण्याची शक्यता असल्याने  उत्पादकांनी योग्य ती खबरदारी घेण्याची गरज आहे. 
- डॉ. संदेश पाटील, आंबा  उत्पादक

Web Title: One has to wait for two months to taste the taste of Raigad mangoes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mangoआंबा