एक प्रभारी गेले अन् दुसरे प्रभारी आले; वैद्यकीय शिक्षण विभागाच्या संचालकपदी डॉ. अजय चंदनवाले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2023 07:57 AM2023-07-15T07:57:47+5:302023-07-15T07:58:08+5:30
वैद्यकीय शिक्षण विभागाला शुक्रवारी हसन मुश्रीफ यांच्या रूपाने नवीन मंत्री मिळाले असून, त्याच्या कार्यकाळात तरी वैद्यकीय शिक्षण विभागाला पूर्णवेळ संचालक पद मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
संताेष आंधळे
मुंबई : राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या संचालकपदी पुन्हा एकदा प्रभारी संचालक म्हणून सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले यांची नियुक्ती करण्यात आली. या पदावर नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. दिलीप म्हैसकर गेली दोन वर्ष प्रभारी संचालक होते. चार वर्षांपासून हे पद एमपीएससीमार्फत भरून पूर्ण वेळ संचालकाची नियुक्ती करणे अपेक्षित असताना या पदाची जाहिरात काढून हे पद का भरले जात नाही यावर जोरदार चर्चा आहे.
वैद्यकीय शिक्षण विभागात एकदा संचालकपद एमपीएससीमार्फत तर एकदा प्रमोशनने भरले जाते. डॉ. वासुदेव तायडे हे एमपीएससी होते. त्यानंतर २०११ मध्ये हे पद प्रमोशनने डॉ. प्रवीण शिनगारे यांना मिळाले. २०१९ मध्ये त्यांच्या निवृत्तीनंतर हे पद एमपीएससीमार्फत भरणे गरजेचे होते. मात्र सहसंचालक डॉ. प्रकाश वाकोडे यांना या पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला. अवघ्या सहा ते सात दिवसांत डॉ. वाकोडे यांनी सहसंचालक डॉ. तात्याराव लहाने यांना अतिरिक्त कार्यभार दिला. डॉ. लहाने यांच्या सेवानिवृत्तीनंतर २०२१ जुलैमध्ये नांदेड येथील शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. दिलीप म्हैसकर यांना अतिरिक्त कार्यभार देण्यात आला. त्यांच्याकडून शुक्रवारी हा कार्यभार सहसंचालक डॉ अजय चंदनवाले यांना देण्यात आला. डॉ. म्हैसकर यांना नांदेड वैद्यकीय महाविद्यालयात अधिष्ठाता पदावर पाठविण्यात आले.
या पदाची एमपीएसीकडून जाहिरात दिली तर राज्यभरातून या पदासाठी पात्रताधारक कुणीही अर्ज करू शकेल. एखाद्या महत्त्वाच्या पदाचा काही वेळ अतिरिक्त कार्यभार देणे हे तात्पुरती व्यवस्था असते. मात्र संचालक पद वर्षानुवर्षे अतिरिक्त कार्यभारावर चालवण्या मागचा हेतू स्पष्ट हाेत नाही. वैद्यकीय शिक्षण विभागाला शुक्रवारी हसन मुश्रीफ यांच्या रूपाने नवीन मंत्री मिळाले असून, त्याच्या कार्यकाळात तरी वैद्यकीय शिक्षण विभागाला पूर्णवेळ संचालक पद मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
डॉ. अजय चंदनवाले यांनी मोठा काळ शासकीय सेवेत गेला असून, १९९२ पासून ते ऑर्थोपेडिक विभागात कार्यरत होते. त्यानंतर त्यांनी विभागप्रमुख, ९ वर्ष अधिष्ठाता पद आणि ४ वर्ष सहसंचालक पदावर काम केले आहे. शुक्रवारी त्यांनी संचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारला.