एक इंच महाराष्ट्र वेगळा होऊ देणार नाही
By admin | Published: February 12, 2017 02:23 AM2017-02-12T02:23:05+5:302017-02-12T02:23:05+5:30
मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रश्नच येत नाही. कोणी स्वप्नात जरी मुंबई तोडण्याचा विचार केला तर तिथे जाऊन त्याची नरडी दाबू. मुंबई, विदर्भच काय महाराष्ट्राचा
मुंबई : मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रश्नच येत नाही. कोणी स्वप्नात जरी मुंबई तोडण्याचा विचार केला तर तिथे जाऊन त्याची नरडी दाबू. मुंबई, विदर्भच काय महाराष्ट्राचा एक इंचही वेगळा होऊ देणार नाही, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर हल्लाबोल केला.
शनिवारी वडाळा येथील प्रचारसभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांना पुन्हा टीकेचे लक्ष्य बनविले. शिवसेनेने सर्वाधिक गुंडांना उमेदवारी दिल्याच्या मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आरोपाचा त्यांनी या वेळी समाचार घेतला. देवस्थानच्या जमिनी हडपणाऱ्या गुंडांनाही भाजपाने पक्षात घेतले. सगळे गुंड सध्या भाजपात दाखल झाले आहेत. गुंडांचा वापर करत निवडणुका जिंकण्याचा डाव मुख्यमंत्री आखत असतील तर निवडणुका बाजूला ठेवून आधी गुंडांचा बंदोबस्त करू. शिवसेनेत गुंड नाहीत, सैनिक आहेत. मुंबईसाठी धावून जाणारे शिवसैनिक आहेत. ९२ साली शिवसैनिकच धावला, अंगावर वार झेलले म्हणून मुंबई वाचली. श्रीकृष्ण आयोगाने अहवालात शिवैनिकांची नावे घेतली. ज्यांनी मुंबई वाचवली ते गुंड नव्हते. तेंव्हा हे भाजपावाले कुठे होते, असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला.
मुद्दे नसले की लोक खोटेनाटे आरोप करतात. मुंबईत जितकी कामे शिवसेनेने केली तितकी कोणत्याच पक्षाने केली नाहीत. चिखलात कमळ फुलते म्हणतात, मग आमच्यावर कमळ फेका चिखल का फेकता, असा सवाल करतानाच यांच्याकडे कमळ नाही फक्त मळ आणि मळमळ आहे. आमच्याकडे विकासाची तळमळ आहे, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. शिवसेनेवर भ्रष्टाचाराचे आरोप केले जातात. पोलीस खाते तुमच्याकडे आहे तरी मुंबईचे पाटणा झाल्याचा आरोप कसा काय करता? आता भाजपा खासदार गोपाळ शेट्टी म्हणाले, रस्त्याच्या कामाला अधिकारी आणि आयुक्त जबाबदार आहेत. त्या कामांशी नगरसेवकांचा संबंध नाही. अधिकारी, आयुक्त नेमण्याचे काम मुख्यमंत्र्यांचे आहे, असे उद्धव म्हणाले.
सामान्य मुंबईकर दरवर्षी २ लाख कोटींचा कर दिल्लीला देतो. पंतप्रधान म्हणून कारभार करायचा सोडून तुमच्या कुंडल्या माझ्याकडे आहेत, अशा धमक्या मोदी देत आहेत. जन्माला येतो त्याची कुंडली बनतेच, मोदींचीसुद्धा कुंडली आहेच.
त्या वेळी बाळासाहेब नसते तर काय केले असते, असा सवालही उद्धव यांनी केला. (प्रतिनिधी)
...हा तर शिवरायांचा अपमान
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या वेळीही शिवरायांचा आशीर्वाद होता. मग शिवरायांच्या महाराष्ट्रासाठी तुम्ही दोन वर्षांत काय केले याचे उत्तर द्या, असे आव्हानही उद्धव ठाकरे यांनी दिले. खोटे बोलणारे मुख्यमंत्री आपल्या राज्याला लाभणे हा शिवरायांचा अपमान आहे, असे उद्धव या वेळी म्हणाले.