जळगावात एक तर नंदुरबारच्या तीन कारखान्यांची साखर ‘गोड’, गळीत हंगामाची तयारी सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2020 02:00 AM2020-09-02T02:00:52+5:302020-09-02T06:40:01+5:30
गेल्या वर्षी एक मेव मुक्ताई शुगर एनर्जी साखर कारखान्याने गळीत हंगाम पूर्ण केला होता. आणि यंदा ही गळीत च्या तयारीला लागल्याचे चित्र आहे. तर दुसरी कडे जिल्हयातील उर्वरित साखर कारखान्याचा गळीत हंगाम यंदाही सुरू होणार नसल्याचीच स्थिती आहे.
जळगाव/धुळे/नंदुरबार : साखर कारखाने सुरू असणे हे त्या जिल्ह्यातील सहकार क्षेत्र बळकट असल्याचे मानले जाते. धुळे जिल्हा वगळता नंदुरबार जिल्ह्यात तीन व जळगाव जिल्ह्यातील केवळ एक कारखाना गळीत हंगाम सुरू करण्याच्या तयारीत आहे.
साधारण १५ आॅक्टोबर नंतर राज्यातील साखर साखर कारखान्याचे गळीत हंगाम सुरू होतात. जळगाव जिल्ह्यातही याच काळात मुहूर्त साधला जातो. गेल्या वर्षी एक मेव मुक्ताई शुगर एनर्जी साखर कारखान्याने गळीत हंगाम पूर्ण केला होता. आणि यंदा ही गळीत च्या तयारीला लागल्याचे चित्र आहे. तर दुसरी कडे जिल्हयातील उर्वरित साखर कारखान्याचा गळीत हंगाम यंदाही सुरू होणार नसल्याचीच स्थिती आहे.
जिल्ह्यातील साखर कारखानदारीत अग्रगण्य असलेल्या फैजपूर येथील मधुकर सहकारी साखर कारखाना आर्थिक संकटात सापडल्याने गेल्या वर्षीपासून बंद आहे. दुसरी कडे चोपडा साखर कारखाना ही आर्थिक कोंडीतून बाहेर पडू न शकल्याने बंद आहे. चाळीसगावचा बेलगंगा, रावेरचा कारखाना खाजगी कंपनीकडे जाऊनही चालू शकला नाही. तर एरंडोल तालुक्यातील वसंत कारखाना अनेक वर्षांपासून बंदच आहे.
जिल्ह्यात खाजगीकरणातून सुरू असलेला मुक्ताई शुगर एनर्जी साखर कारखान्याने मागील ६ गळीत हंगाम यशस्वी पूर्ण केले असून वीज निर्मिती सह प्रकल्प ही यशस्वी झाला आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यात एकमेव मुक्ताईनगर चा हा कारखाना सुरू होता. कारखान्याने १०.६७ चा उतारा साध्य केला होता.
२५ मेट्रिक टन प्रति दिवस क्षमता असलेल्या या कारखान्यात २०२० - २१ च्या गळीत हंगामात ५ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे यातून १०.५ टक्के उतारा गाठून पाच लाख २५ हजार क्विंटल साखर उत्पादन होईल तर १२ मेगावॉट वीज निर्मिती होईल असा विश्वास कारखान्याचे व्हाईस चेअरमन अॅड रोहिणी खडसे व कार्यकारी संचालक देवरे यांनी व्यक्त केला.
तिन्ही साखर कारखाने यंदा गाळप हंगाम घेणार
नंदुरबार जिल्ह्यात यंदा ३० हजार एकरपेक्षा अधीक क्षेत्रावर ऊस उपलब्ध आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तिन्ही साखर कारखाने यंदा सुरू होणार आहे. आॅक्टोबरच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू होणार असल्याची माहिती कारखान्यांच्या सूत्रांनी दिली. जिल्ह्यात सहकारी तत्वावरील दोन तर खाजगी तत्वावरील एक कारखाना आहे. हे तिन्ही कारखाने दरवर्षी गाळप हंगाम घेतात. यंदाही त्यांनी गाळपाचे नियोजन केले आहे. यंदा जिल्ह्यात ३० हजार एकरपेक्षा अधीक क्षेत्रावर ऊस उपलब्ध आहे. त्यामुळे सहकारी तत्वावरील शहादा येथील सातपुडा साखर कारखाना, डोकारे, ता.नवापूर येथील आदिवासी सहकारी साखर कारखाना आणि खाजगी तत्वावरील समशेरपूर, ता.नंदुरबार येथील आयान शुगर साखर कारखाने यंदा गाळप हंगाम घेणार आहेत. या तिन्ही साखर कारखान्यांनी मशिनरी दुसरूस्तीच्या कामाला सुरुवात केली आहे. आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात ते काम पुर्ण होणार आहे. त्यानंतर आॅक्टोबरच्या तिसºया आठवड्यात गाळप हंगामाला सुरुवात होणार आहे. साधारणत: पाच ते सहा महिने कारखाने सुरू राहतील असा अंदाज आहे.
धुळे जिल्ह्यातील चारही साखर कारखाने बंदावस्थेत
धुळे जिल्ह्यात पूर्वी चार साखर कारखाने होते. मात्र आर्थिक परिस्थितीमुळे हे चारही कारखाने अनेक वर्षांपासून बंदावस्थेत आहे. जिल्ह्यातील नवलनगर येथील संजय सहकारी साखर कारखाना अनेक वर्षांपासून बंद आहे. तर शिंदखेडा तालुक्यातील विखुर्ले येथे असलेला शिंदखेडा शेतकरी सहकारी साखर कारखाना काही दिवसच सुरू होता. साक्री तालुक्यातील भदाणे येथील पांझरा-कान सहकारी साखर कारखाना हा देखील कर्जबाजारीपणामुळे २००० सालापासून बंद आहे. या कारखान्याची गाळप क्षमता १२०० मेट्रीक टन एवढी होती. तर शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखानाही जिल्हा बॅँकेच्या थकीत कर्जामुळे २०११-१२ पासून बंद आहे. या कारखान्याची गाळप क्षमता २५०० मेट्रीक टन एवढी होती. दरम्यान जिल्ह्यात एकही साखर कारखाना नसल्याने, शेतकऱ्यांनीही ऊस लागवडीकडे पाठ फिरवली आहे. यावर्षी ४ हजार ५३० हेक्टर लागडीचे उद्दिष्ट असतांना फक्त १ हजार ३५६ हेक्टर क्षेत्रावरच ऊसाची लागवड झालेली आहे.