भंवरलालजी जैन यांच्या निधनाने एक कर्मयोगी हरपला - राजेंद्र दर्डा
By admin | Published: February 25, 2016 07:22 PM2016-02-25T19:22:55+5:302016-02-25T19:22:55+5:30
ज्येष्ठ उद्योगपती भंवरलालजी जैन यांच्या निधनाने एक कर्मयोगी हरपला आहे. श्रमसंस्कृती आणि कृषीसंस्कृती ही जीवननिष्ठा मानून आयुष्यभर समर्पित भावनेने ते कार्यरत राहिले.
Next
>- राजेंद्र दर्डा, एडीटर- इन- चिफ, लोकमत वृत्तपत्र समूह
ज्येष्ठ उद्योगपती भंवरलालजी जैन यांच्या निधनाने एक कर्मयोगी हरपला आहे. श्रमसंस्कृती आणि कृषीसंस्कृती ही जीवननिष्ठा मानून आयुष्यभर समर्पित भावनेने ते कार्यरत राहिले. आयुष्यातील खडतर परिस्थिती बदलण्यासाठी प्रशासनात उच्च पदावर चालून आलेली नोकरी नाकारून या भूमीपुत्राने शेतीपूरक उद्योगाची मूहूर्तमेढ रोवली आणि इतिहास निर्माण केला. आपल्यासोबतच अवती-भोवतीच्या लोकांचेही जीवनमान बदलून त्यांचीही उन्नती व्हावी, माणसापासून ते प्राणीमात्रांचीही सेवा घडावी हिच त्यांची प्रेरणा होती. जैन उद्योग समुहाच्या माध्यमातून त्यांनी हजारो लोकांचे आयुष्य घडविले. शेती संशोधनात त्यांनी सातत्याने नव-नवीन प्रयोग केले. पाण्याचे महत्व ओळखून कालदर्शी असणाºया भंवरलालजींनी ठिबक सिंचनाचा कृतिशील पुरस्कार करीत कृषिक्षेत्रात क्रांती केली. व्यापार, उद्योग, व्यवसायाच्या पलीकडे जाऊन सामाजिक बांधिलकीची जोपासना केली. अनेक सेवाभावी संस्थांचे ते आधारवड होते. जळगावचे नाव जगाच्या नकाशावर नेताना आपल्या मातीशी नाते त्यांनी कधीही तोडले नाही. माझे वडील जवाहरलालजी दर्डा आणि त्यांचे जिव्हाळ्याचे नाते होते. दर्डा परिवार आणि लोकमत परिवाराशी त्यांचे ऋणानुबंध होते. भंवरलालजींच्या निधनाने खान्देश आणि महाराष्ट्राची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे.