दुचाकी अपघातात एक ठार

By admin | Published: May 21, 2016 02:32 AM2016-05-21T02:32:42+5:302016-05-21T02:32:42+5:30

पामबीच मार्गावर अपघातामध्ये पनवेलच्या बारमालकाच्या मृत्यूची घटना शुक्रवारी पहाटे घडली आहे.

One killed in a bike accident | दुचाकी अपघातात एक ठार

दुचाकी अपघातात एक ठार

Next


नवी मुंबई : पामबीच मार्गावर अपघातामध्ये पनवेलच्या बारमालकाच्या मृत्यूची घटना शुक्रवारी पहाटे घडली आहे. कोपरखैरणेत राहणाऱ्या बारबालांना सोडण्यासाठी जात असताना हा अपघात घडला. यावेळी बारमालक व बारबाला तिघेही मद्यधुंद अवस्थेत होते.
सुधीर शेट्टी (३५) असे मयत बारमालकाचे नाव आहे. पनवेलमधील सुकापूर परिसरातील एस.बी. नाईट बार ते चालवत होते, असे समजते. शुक्रवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ते दोन बारबालांना घेवून कोपरखैरणेला जात होते. पिंकी दास व खातुना बी. अशी दोघींची नावे आहेत. त्या एस.बी. नाईट बारमधील कामगार असून कोपरखैरणेला राहणाऱ्या आहेत. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत त्या कामानिमित्त थांबल्यानंतर शुक्रवारी पहाटेच्या सुमारास शेट्टी स्वत: त्यांना मोटारसायकलने घरी सोडण्यासाठी चालले होते. या दरम्यान त्यांची होंडा ग्लॅमर मोटारसायकल (एमएच ४३ एई १०७९) पामबीच मार्गावर नेरुळ पोलीस ठाणे हद्दीत आली असता अपघात झाला. अपघातावेळी शेट्टी स्वत: मोटारसायकल चालवत होते, तर दोन्ही बारबाला मागे बसलेल्या होत्या. शेट्टी यांनी मर्यादेपेक्षा जास्त वेगात दुचाकी चालवल्यामुळे त्यांचा ताबा सुटला. त्यामध्ये मोटारसायकल रस्त्याच्या दुभाजकाला आदळून तिघेही गंभीर जखमी झाले होते. सदर अपघाताची माहिती मिळताच नेरुळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून जखमींना नेरुळच्या डी. वाय. पाटील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु उपचारादरम्यान डॉक्टरांनी शेट्टी यांना मृत घोषित केले, तर दोन्ही बारबालांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरु असल्याचे वरिष्ठ निरीक्षक अधिकराव पोळ यांनी सांगितले. अपघातावेळी तिघेही मद्यधुंद अवस्थेत असल्यामुळे शेट्टी यांचा मोटारसायकलवरील ताबा सुटल्याने हा अपघात घडल्याचेही पोळ यांनी सांगितले. त्यानुसार स्वत:च्या मृत्यूला जबाबदार व अपघाताला कारणीभूत ठरल्यामुळे मयत शेट्टी यांच्याविरोधात नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच शेट्टी यांच्या निधनाबद्दल हळहळ बार मालकांकडून व्यक्त होत आहे.
एस. बी. नाईट बारवर यापूर्वी आॅक्टोबर २०१५ मध्ये पोलिसांनी छापा टाकून कारवाई केलेली आहे. रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या या बारमध्ये अल्पवयीन मुलींचा वापर होत असल्याची तक्रार त्यावेळी एका समाजसेवी संघटनेने केलेली. तर पनवेल परिसरातील चर्चेतल्या बारपैकी एस.बी. नाईट हा एक बार असून बारबालांना घरी सोडण्यासाठी शेट्टी स्वत: मोटारसायकलने का गेले? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Web Title: One killed in a bike accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.