शहापूरजवळ अपघातात एक ठार, चौघे गंभीर
By admin | Published: April 9, 2017 09:04 PM2017-04-09T21:04:03+5:302017-04-09T21:05:43+5:30
सावदा येथील डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या भारती महाजन या आपल्या नातेवाईक व मुलासोबत मुंबई (शहापूर) येथे जात असताना
ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. 9 - सावदा येथील डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या भारती महाजन या आपल्या नातेवाईक व मुलासोबत ठाणे (शहापूर) येथे जात असताना गतिरोधकावर दुचाकी आदळून झालेल्या अपघातात महाजन यांचा मुलगा विजय किरणकांत महाजन (वय १६) हा जागीच ठार झाला असून वाहनातील अन्य चार जण गंभीर जखमी झाले आहे. हा अपघात रविवारी सकाळी शहापूरजवळ घडला.
या अपघाताबाबत प्राप्त माहिती अशी की, शनिवार, ८ रोजी विजय याची इयत्ता दहावीची (सीबीएसई) परीक्षा संपल्यावर प्राचार्या भारती महाजन या आपल्या गाडी (क्ऱएम.एच.१९ यूबी आर.४) ने मुलगा विजय, वडिल मधुकर पुंजो चौधरी, भाऊ राजेंद्र मधुकर चौधरी व चालक गणेश बऱ्हाटे यांना सोबत घेऊन शनिवारी रात्रीच शहापूर (मुंबई) कडे रवाना झाल्या होत्या. रविवारी सकाळी ५.३० वाजेच्या सुमारास गतिरोधकावर वाहन आदळून अपघात झाला़ त्यात प्राचार्य भारती महाजन यांचा मुलगा विजय हा जागीच ठार झाला तर वाहनातील अन्य गंभीर जखमी झाले. त्यात प्राचार्या महाजन यांच्या पायाला तर चालक बऱ्हाटे यासदेखील गंभीर दुखापत झाली आहे़ सर्व जखमींना तत्काळ उपचारासाठी ठाणे येथील क्रिटीकल रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
अपघाताची माहिती मिळताच प्राचार्या यांचे पती किरणकांत, आई तसेच अन्य नातेवाईक व इंग्लिश मीडियमचे शिक्षक वर्ग मुंबईकडे रवाना झाल्याची माहिती मिळाली.
पोटात रक्तस्त्राव झाल्याने विजयचा मृत्यू
चारचाकी गाडी ही गतिरोधकावर आदळल्याने गाडीत बसलेले सर्वच गंभीर जखमी झाले त्यात विजय याच्या पोटात मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर प्राचार्या महाजन यांच्या पायाला गंभीर इजा झाली असून सर्व जखमींवर ठाण्याच्या क्रिटीकल रुग्णालयात उपचार सुरू आहे. या रुग्णालयात डॉ.उल्हास पाटील यांची कन्या डॉ.केतकी, जावई वैभव व पुतण्या समर हे ठाण मांडून आहे व तज्ञ डॉक्टरांचे पथक सर्वांवर उपचार करत असल्याची माहिती स्वत: डॉ.उल्हास पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली.
आज अंत्यसंस्कार
मयत विजयवर १० रोजी सायंकाळी पाच वाजता सावदा येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील़ सावदा रोडवरील इंग्लिश मेडियम स्कूलच्या आवारातील निवासस्थानापासून अंत्ययात्रा निघेल.
शाळेला तीन दिवस सुटी
डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूलला तीन दिवस सुटी जाहीर करण्यात आली असल्याचे शाळा प्रशासनातर्फे सांगण्यात आले. (वार्ताहर)