स्वतंत्र विदर्भासाठी एक लाखावर ई-मेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2016 12:53 AM2016-07-26T00:53:53+5:302016-07-26T00:53:53+5:30
स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीचे आंदोलन आता इंटरनेटसह सोशल मीडियाद्वारेही लढले जात आहे. याचाच एक भाग म्हणून स्वतंत्र विदर्भाची मागणी करणारे सुमारे एक लाख ई-मेल
नागपूर : स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीचे आंदोलन आता इंटरनेटसह सोशल मीडियाद्वारेही लढले जात आहे. याचाच एक भाग म्हणून स्वतंत्र विदर्भाची मागणी करणारे सुमारे एक लाख ई-मेल राष्ट्रपती व पंतप्रधानांसह प्रमुख नेत्यांना पाठविण्यात आले आहे. यात नागपुरातून सर्वाधिक ३७ हजार ई-मेल आहेत.
विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या युवा आघाडीने या अभिनव आंदोलनासाठी पुढाकार घेतला आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेतील काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे, केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आदींना ई-मेल पाठवून वेगळ््या विदर्भाची मागणी करण्यात आली आहे. १६ ते १८ जुलै दरम्यान हे आंदोलन करण्यात आले.
वेगळ्या राज्यासाठी तेलंगणमध्ये हिंसात्मक आंदोलन झाले, तसे आंदोलन पुन्हा होऊ नये, अशी विनंती करीत संबंधितांना आपले नाव व जिल्ह्याची माहिती लिहून संदेश पाठवावा, असे आवाहनही करण्यात आले होते.
या आवाहनाला वैदर्भीय जनतेने, विशेषत: तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत संपूर्ण विदर्भातून एक लाख सात हजार ई-मेल पाठविण्यात आले. (प्रतिनिधी)
जिल्हानिहाय ई-मेल
नागपूर : ३७,०००, भंडारा : ६,०००, गोंदिया : ३,०००, गडचिरोली : ५,०००, वर्धा : ३,०००, चंद्रपूर : १४,०००, यवतमाळ : २१,०००, अमरावती : १०,०००, अकोला : २,०००, वाशिम : ४,०००, बुलडाणा : २,०००