एक लाख भाकऱ्या आणि दहा कढई पिठले
By admin | Published: July 14, 2015 12:36 AM2015-07-14T00:36:35+5:302015-07-14T00:36:35+5:30
शहरी भागातील मुक्काम संपवून संत तुकाराम महाराज पालखी सोहळा ग्रामीण भागात दौंड तालुक्यात दाखल झाला. यवतमधील मुक्कामाने पालखी सोहळ्यातील वारकरी
यवत (जि. पुणे) : शहरी भागातील मुक्काम संपवून संत तुकाराम महाराज पालखी सोहळा ग्रामीण भागात दौंड तालुक्यात दाखल झाला. यवतमधील मुक्कामाने पालखी सोहळ्यातील वारकरी बांधवांना घराच्या जेवणाची आठवण करून दिली.
यवतमध्ये संत तुकाराम पालखीचा मुक्काम श्री काळभैरवनाथ मंदिरात असतो. ग्रामस्थांच्या वतीने वारकऱ्यांना पिठले-भाकरीची मेजवानी दिली जाते. ग्रामस्थ घरोघरी भाकरी बनवून मंदिरात जमा करतात तर पिठले मंदिरात एकत्रित बनविले जाते. पालखी सोहळा मंदिरात मुक्कामी आल्यानंतर सर्व वारकऱ्यांना जेवण दिले जाते. ही पंरपरा गेल्या अनेक वर्षांपासूनची आहे. देहू ते पंढरपूर वारीत यवतमधील जेवण म्हणजे खास घराची आठवण देणारेच असते, अशा भावना वारकरी व्यक्त करतात. दहा कढई पिठले त्यातही त्याची विशेष खास चव आणि त्याच दिवशी घरोघर बनविलेल्या भाकरी हे वैशिष्ट्य असते.
सर्वधर्मीय नागरिक बनवतात भाकरी
हिंदू, मुस्लिम व इतर सर्व जाती-धर्मातील ग्रामस्थ पहाटे पाचपासून भाकऱ्या घरी बनवून श्री काळभैरवनाथ मंदिरात आणून देतात. पालखी सोहळ्यातील लाखो वारकऱ्यांना पुरतील एवढ्या भाकऱ्या मंदिरात जमतात.