आयटीआय प्रवेशाचा एक लाखाचा टप्पा पार; समुपदेशन फेरी सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 10:28 AM2021-10-20T10:28:49+5:302021-10-20T10:29:08+5:30
३० ऑक्टोबरपर्यंत प्रवेशनिश्चितीचे आवाहन
लाेकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात आयटीआय प्रवेशाचा १ लाख प्रवेशाचा टप्पा पूर्ण झाला असून ३० ऑक्टोबरपर्यंत आयटीआय प्रवेशाची समुपदेशन फेरी सुरू राहणार आहे, तर आतापर्यंत आयटीआयचे जवळपास एकूण ७० टक्के प्रवेश झाले असल्याची माहिती व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालयाकडून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी उपलब्ध असल्याने विद्यार्थ्यांनी समुपदेशन फेरीतून आपले प्रवेश निश्चित करावेत, असे आवाहन संचालक दिंगबर दळवी यांनी केले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अकरावी प्रवेशाला झालेल्या विलंबाने आयटीआय प्रवेशाला यंदा विद्यार्थ्यांची पसंती मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. पहिल्या चार फेऱ्यांमध्ये विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. आयटीआयच्या पहिल्या फेरीमध्ये ३१,५२९, दुसऱ्या फेरीत १५,५९८, तिसऱ्या फेरीत १५,२६१ आणि चौथ्या फेरीत ९९५८ असे चार फेऱ्यांमध्ये तब्बल ७२ हजार ३४६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले होते. मागील वर्षी या
चार फेऱ्यांमध्ये ६२ हजार ७८४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले होते. त्यामुळे समुपदेशन फेरीमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रवेशाच्या संख्येत वाढ होणार आहे. आतापर्यंत समुपदेशन फेरीमध्ये २५ हजार ६३८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. यामध्ये शासकीय संस्थांमध्ये १९,७५५, तर खासगी संस्थांमध्ये ५८८३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. मात्र, गतवर्षी समुपदेशन फेरीमध्ये ३२,६७६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले होते. त्या तुलनेत यंदा समुपदेश फेरीला विद्यार्थ्यांचा फारच कमी प्रतिसाद मिळाला असला तरी त्यात वाढ अपेक्षित आहे.
प्रवेशाची स्थिती
फेरी प्रवेश
२०२१ २०२०
पहिली ३१५२९ २५५८२
दुसरी १५५९८ १३१०२
तिसरी १५२६१ १२७७७
चौथी ९९५८ ११३२३
समुपदेश २५६३८ ३२६७६
(प्रवेश सुरू)