Maharashtra election 2019 : पाच वर्षांत एक कोटी रोजगार; ३० हजार किमीचे रस्ते बांधणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2019 06:31 AM2019-10-16T06:31:47+5:302019-10-16T06:46:01+5:30

‘संकल्पपत्रा’त भाजपचे आश्वासन : ११ धरणे जोडून संपूर्ण मराठवाड्याला देणार पाणी

One million jobs in five years; Construction of 30 thousand km of roads; BJP Agenda | Maharashtra election 2019 : पाच वर्षांत एक कोटी रोजगार; ३० हजार किमीचे रस्ते बांधणार

Maharashtra election 2019 : पाच वर्षांत एक कोटी रोजगार; ३० हजार किमीचे रस्ते बांधणार

Next

मुंबई : राज्यात येत्या पाच वर्षांत एक कोटी रोजगार निर्मिती, प्रत्येक बेघराला घर, ३० हजार किलोमीटरचे रस्ते, अशा अनेक आश्वासनांचा वर्षाव भाजपने आपल्या संकल्पपत्रात केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे कार्याध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी हे संकल्पपत्र मंगळवारी जाहीर केले.


विधानसभा निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या संकल्पपत्रात मराठवाडा वॉटर ग्रीड या महत्त्वाकांक्षी योजनेत ११ धरणे जोडून संपूर्ण मराठवाड्यात बंदिस्त पाइपद्वारे पाणीपुरवठा, एक कोटी कुटुंबांना महिला बचत गटांशी जोडणे, पायाभूत सुविधा क्षेत्रात येत्या पाच वर्षांत केंद्र सरकारच्या मदतीने पाच लाख कोटी रुपयांची गुंतवणूक, सर्व प्रकारच्या रस्त्यांची कायमस्वरूपी देखभाल दुरुस्ती करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे, सर्व ग्रामपंचायती इंटरनेटने जोडणे, पाचवीपासून शेतीवर आधारित आभ्यासक्रम, शालेय शिक्षणात स्वसंरक्षणाचे धडे, अशी आश्वासने दिली आहेत. अमरावती, अकोला, यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, धुळे, रत्नागिरी, कोल्हापूर, कराड या विमानतळांचा विकास करणार आणि , मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनच्या उभारणी हे निर्धारही संकल्पपत्रात आहेत. नाशिकमध्ये हायब्रीड मेट्रो व औरंगाबादमध्ये अत्याधुनिक मास रॅपिड ट्रान्सपोर्ट सिस्टिम, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात पाच नवीन ड्रायपोर्ट उभारणार असल्याचे या संकल्पपत्रात म्हटले आहे.
शहीद जवान व पोलिसांच्या कुटुंबीयांचा पुनर्वसनाचा विशेष कार्यक्रम, सर्व प्रकल्पग्रस्तांचे तातडीने पुनर्वसन करण्यात येईल, अशी आश्वासनेही भाजपने दिली आहेत.


फुले, सावरकरांना भारतरत्नसाठी पाठपुरावा
महात्मा जोतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांचा भारतरत्न पुरस्काराने गौरव व्हावा, यासाठी राज्य सरकार केंद्राकडे पाठपुरावा करेल, असे आश्वासन भाजपने जाहीरनाम्यात दिले आहे.


‘अटल थाळी’ नाहीच
शिवसेनेने १० रुपयांत थाळी देण्याचे आश्वासन वचननाम्यात दिले आहे. भाजपही पाच रुपयांत अटल आहार देणार अशी चर्चा होती. मात्र, जाहीरनाम्यात या थाळीचा उल्लेख नाही.

सामाजिक क्षेत्रासाठी...
इंदूमिलच्या जागेवरील महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक २०२० पर्यंत पूर्ण करणार.
अरबी समुद्रातील शिवस्मारक पाच वर्षांत पूर्ण करणार
वसंतराव नाईक महामंडळासाठी ५०० कोटी रु. देणार.
अनुसूचित जमातींच्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक लोकसंख्येच्या ब्लॉकमध्ये एकलव्य शाळा उभारणार.
मराठा, धनगर, ओबीसी, वंचित आदी समाजघटकांचा संतुलित विकास.
दिव्यांगांच्या मानधनात करणार भरीव वाढ.

मुंबईसाठी । केंद्रीय विद्यापीठ उभारणार । लोकल रेल्वे वाहतुकीचा प्रवास सुखकर होण्यासाठी विविध प्रकल्प । मुंबई-नागपूर मालवाहतुकीसाठी फ्रेट कॉरिडॉर.
कोकणसाठी । किनारपट्टीवर आंतरराष्ट्रीय व्यापारी व प्रवासी आयातनिर्यात क्षमतेची दहा बंदरे । सर्व मच्छीमार बंदरांचा विकास । बंदरे राष्ट्रीय महामार्ग व रेल्वेने राज्याला जोडणार । मुंबई-सिंधुदुर्ग मार्गावर स्वस्त जलवाहतूक

Web Title: One million jobs in five years; Construction of 30 thousand km of roads; BJP Agenda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.