'ही' एक चूक अन् मिस्त्रींनी गमावला जीव; आज अंत्यसंस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2022 09:30 AM2022-09-06T09:30:58+5:302022-09-06T09:32:15+5:30
कारने २० किलाेमीटर अंतर ९ मिनिटांत पार केल्याचे समाेर आले आहे...
मुंबई/कासा : भरधाव कारने केलेले चुकीचे ओव्हरटेक आणि गाडी लेनमध्ये आणताना चालकाचा चुकलेला अंदाज यामुळे उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्यासह दोघांचा मृत्यू झाल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला. त्यांच्या कारने २० किलाेमीटर अंतर ९ मिनिटांत पार केल्याचे समाेर आले.
वेगाचा अंदाज चुकल्याने चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि ती पुलाच्या कठड्यावर धडकली. चालक डॉ. अनाहिता पंडोल आणि मिस्त्री यांनी सीटबेल्ट लावलेले नसल्याने अपघात होताच एअर बॅग उघडली नाही, असे सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर पोलिसांनी सांगितले. डॉ. अनाहिता आणि त्यांचे पती दरायुस यांना वापी येथील रुग्णालयातून गिरगावच्या सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयात हलविले आहे.
आज अंत्यसंस्कार शवविच्छेदन अहवालात सायरस यांचा जबर मार व त्यामुळे झालेल्या जखमांमुळे मृत्यू झाल्याचे आढळून आले आहे. मंगळवारी, ६ सप्टेंबरला त्यांच्या पार्थिवावर वरळीतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.