रामाकडे अलिप्ततेने पहायला शिकणे आवश्यक : बाबासाहेब पुरंदरे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2019 10:14 PM2019-12-14T22:14:36+5:302019-12-14T22:15:27+5:30
राम मंदिर व्हावे असे ज्यांना वाटायचे त्यामध्ये अहिंदू सुद्धा मोठ्या संख्येने
पुणे : अयोध्येमध्ये राम मंदिर उभे राहतेय याचा आनंद आहे. काहींना धाडस होत नसले तरी त्यांना आनंद होतोच आहे. मी कारसेवेमध्ये सहभागी झालेलो होतो. त्या दिवशीची रात्र आम्ही अयोध्येमध्ये पदपथावर झोपून काढली होती. बंदीवासात असलेला राम पुन्हा समर्थपणे उभा राहतोय. राम मंदिर व्हावे असे ज्यांना वाटायचे त्यामध्ये अहिंदू सुद्धा मोठ्या संख्येने होते. त्यामुळे रामाकडे अलिप्ततेने पाहता येणे आवश्यक असल्याचे मत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी व्यक्त केले.
भारत विकास परिषदेच्या शिवाजीनगर शाखेच्यावतीने आयोजित स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेमध्ये पुरंदरे यांच्या प्रकट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी ही मुलाखत घेतली. यावेळी, परिषदेचे राष्ट्रीय सचिव राजेंद्र जोग, शिवाजीनगरचे अध्यक्ष जगदीश घोंगडे, विश्वास नायडू, डॉ. हर्डीकर, अभिजीत फडके उपस्थित होते. यावेळी पुरंदरे म्हणाले, मी आतापर्यंत चार कांदबºया लिहिल्या, इतिहासावर पुस्तके लिहिली, हजारो व्याख्याने दिली, नाटकही केले. परंतू, मला कोणीही कादंबरीकार, इतिहासकार, व्याख्याता, नाटककार म्हणत नाही. मी सगळ्यांत आहे; परंतू कशातच नाही.
आमचे मूळ आडनाव लोकरस असून कर्नाटकातून पुर्वज मोरगावला आले. तेथे एका घटनेमुळे वाघ आडनाव पडले. पुढे चालून पुरंदरे वाघ असे पडलेले आडनाव बदलत जाऊन फक्त पुरंदरे राहिल्याचे त्यांनी सांगितले. उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या मुलाखतीमध्ये त्यांनी आयुष्यातील पहिले व्याख्यान कधी व केव्हा दिले, भारत इतिहास संशोधक मंडळातील अभ्यास आणि निवडणुकीचे किस्से, आवडते व्याख्याते म्हणून स्वा. सावरकरांविषयीच्या भावना यावेळी विषद केल्या. यासोबतच पु. ल. देशपांडे, दामू केंकरे, आचार्य अत्रे, शांताबाई हुबळीकर, बालगंधर्व, नानासाहेब फाटक, ललिता पवार, गो. नी. दांडेकर, चि. वी. जोशी, दिनानाथ दलाल, दिनानाथ मंगेशकर, लता मंगेशकर, दादरा-नगर-हवेली आणि गोवा मुक्ती संग्रामाविषयीच्या आठवणी जागविल्या. आपण टीव्ही फारसे पाहात नाही. परंतू, क्रिकेट पहायला खूप आवडते. लहानपणी मी डावखुरा बॉलर होतो. छान खेळता यायचे असे ते म्हणाले.
शिवचरित्र प्रकाशित करण्यासाठीचा खर्च हडपसरमध्ये खरेदी केलेल्या कोथिंबीरीच्या जुडया मुंबईत विकून जुळविला. जाणता राजा या नाटकाला आधी ह्यशेवटीचा दिवस गोड व्हावा असे नाव दिले होते. परंतू, त्याच नावाचे दुसरे नाटक आल्याने वकिलाच्या सल्ल्याने समर्थ रामदासांच्या ओवीतील जाणता राजा हे नाव दिले. या नाटकामध्ये डॉ. श्रीराम लागू, चंद्रकांत मांढरे, ज्योत्सा भोळे, दुगार्बाई खोटे, वसंत शिंदे आदी कलाकारांनी काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. शिवचरित्र साक्षात उभे करणे आवश्यक आहे. मग ते कोणत्याही माध्यमाने करा. ऐतिहासिक कलाकृती निर्माण करताना सत्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यासाठीच शिवसृष्टीचे काम हाती घेतले आहे. त्यातील एक भाग बांधून पूर्ण झाल्याचे पुरंदरे म्हणाले.
====
राजा हा विष्णूचा अवतार असतो अशी मान्यता आहे. निवडून आलेले लोकप्रतिनिधी सुद्धा राज्यकर्तेच आहेत. त्यामुळे त्यांनी एकमेकांचा अपमान करु नये किंवा नागरिकांनीही त्यांचा अपमान करु नये. वृत्तवाहिन्यांनी सुद्धा लोकप्रतिनिधी, राज्यकर्ते यांच्यासह समाजातील प्रतिष्ठितांचा अपमान करु नये. सर्वांनी एकमेकांचा सन्मान राखायला हवा असे पुरंदरे यावेळी म्हणाले.