"'वन नेशन वन इलेक्शन' म्हणजे भारतात अमेरिकेसारखी राष्ट्राध्यक्ष पद्धत आणण्याचा डाव"
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 02:41 PM2024-09-19T14:41:55+5:302024-09-19T14:42:39+5:30
कॅबिनेटमध्ये वन नेशन, वन इलेक्शन यासाठी बनवलेल्या समितीच्या शिफारशींना मंजुरी देण्यात आली.
मुंबई - वन नेशन, वन इलेक्शन या प्रस्तावाला केंद्रीय कॅबिनेटमध्ये मंजुरी मिळाली आहे. त्यानंतर देशात विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्यात. वन नेशन, वन इलेक्शन ही पद्धत म्हणजे भारतात अमेरिकेसारखी राष्ट्राध्यक्ष पद्धत आणण्याचा डाव आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला.
माध्यमांशी बोलताना जयंत पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, आपल्या देशात संघराज्य पद्धत आहे मात्र देशात वन नेशन वन इलेक्शन आणून अमेरिकेसारखी राष्ट्राध्यक्ष पद्धत आणणे हा भाजपचा डाव आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घालून दिलेली लोकशाही चौकट समूळ नष्ट करण्याचे पहिले पाऊल आहे. देशाची घटना बदलण्याच्या मनसुब्यामुळे लोकसभा निवडणुकीत भाजपाला फटका बसला होता. आता पुन्हा घटना बदलण्याचा प्रकार भाजपा समोर आणत आहे असा आरोप त्यांनी केला.
तसेच भारतीय जनता पक्षाने नगरपालिका, महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टाळलेल्या आहेत. ते वन नेशन वन इलेक्शनची भाषा बोलतात हे आश्चर्यकारक आहे. मागे लोकसभा निवडणुकीत सात टप्प्यांमध्ये निवडणूक घेण्यात आली. त्यातही गोंधळ झाला अशा परिस्थितीत वन नेशन वन इलेक्शन करणे शक्य आहे का? असा परखड सवालही जयंत पाटील यांनी उपस्थित केला.
राज ठाकरेंनीही उडवली खिल्ली
एक देश एक निवडणूक' हे सर्व ठीक आहे, आधी राज्यातल्या महापालिका, नगरपालिकांच्या निवडणुका घ्या. येत्या ऑक्टोबर २०२४ मध्ये कित्येक महापालिकांमध्ये, नगरपालिकांमध्ये प्रशासक येऊन ४ वर्ष होतील. इतका काळ नगरसेवक नाहीत म्हणजे लोकप्रतिनिधी नाहीत. ते जास्त महत्वाचं नाही का? स्थानिक स्वराज्य संस्थांचा थेट संबंध सामान्य माणसांच्या जगण्याशी, त्यांच्या प्रश्नांशी असतो. त्याच्याच निवडणुका होत नसतील तर सामान्य माणसाने जायचं कोणाकडे? निवडणुकांचं महत्व इतकंच वाटतंय तर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर घ्या अशा शब्दात राज ठाकरेंनी केंद्राच्या या प्रस्तावाची खिल्ली उडवली आहे.