स्त्री-पुरुषामधील एका रात्रीचे शरीरसंबंध म्हणजे लग्न नाही- कोर्ट
By Admin | Published: June 11, 2017 11:39 AM2017-06-11T11:39:02+5:302017-06-11T11:39:02+5:30
लिव्ह-इन-रिलेशनशिप किंवा वन नाइट स्टँड म्हणजे हिंदू कायद्यानुसार लग्न नाही
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 11 - लिव्ह-इन-रिलेशनशिप किंवा वन नाइट स्टँड म्हणजे हिंदू कायद्यानुसार लग्न नाही. अशा संबंधातून जन्माला आलेल्या मुलांना वडिलांच्या संपत्तीवर हक्क सांगता येत नाही, असं मुंबई उच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. उच्च न्यायालयाने अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या मुलाला नैतिक संबंधातून जन्माला आलेल्या मुलाप्रमाणेच वडिलांच्या संपत्तीवर दावा करण्याचा अधिकार आहे. मात्र अनैतिक संबंधातून जन्माला आलेले मूल वडिलोपार्जित संपत्तीवर आपला अधिकार सांगू शकत नाही, हे देखील उच्च न्यायालयाने नमूद केले आहे. या निर्णयामुळे एका मुलीला तिच्या मृत्युमुखी पडलेल्या वडिलांची संपत्ती आणि सेवानिवृत्ती वेतनातील काही हिस्सा मिळू शकणार आहे.
मूल नैतिक की अनैतिक संबंधांतून जन्माला आले आहे, याचा निर्णय घेण्यासाठी ‘विवाह’ ही महत्त्वाची अट आहे, असे न्या. मृदूला भाटकर यांनी अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या मुलीच्या अर्जावर निर्णय देताना म्हटले. मुलीच्या वडिलांचे विवाहबाह्य संबंध होते आणि त्यातून त्यांना मुलगी झाली. ‘वडिलांच्या वडिलोपार्जित संपत्तीवर दावा करण्याचा अधिकार अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या मुलाला अजिबात नाही, यात शंकाच नाही. मात्र या मुलाला वडिलांच्या नैतिक संबंधातून जन्माला आलेल्या मुलाप्रमाणे वडिलांच्या संपत्तीवर व अन्य लाभांवर दावा करण्याचा अधिकार आहे. बेकायदा विवाहातून जन्माला आलेल्या मुलासंदर्भातील काही सामाजिक विसंगती दूर करण्यासाठी कायदेमंडळाने प्रगतिशील पाऊल उचलले आहे,’ असे न्या. भाटकर यांनी म्हटले.
विवाह एक समाजिक बंधन आहे तर मूल जन्माला येणे हे नैसर्गिक आहे. कधी आणि कसा जन्म घ्यायचा, हे माणसाच्या हातात नाही. त्यामुळे अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या मुलाला त्याच्या अधिकारापासून वंचित ठेवले जाऊ शकत नाही. तेच मूल जर नैतिक संबंधातून जन्माला आले असते तर त्याला जे अधिकार मिळाले असते, ते त्याला द्यायला हवेत, असेही न्या. भाटकर म्हणाले.
भारतात लिव्ह-इन-रिलेशीपमध्ये राहण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे या नात्यालाही विवाहाप्रमाणे स्वीकारले जात आहे. ‘मातृत्व’ मान्य केले जाते व सिद्धही होते मात्र ज्या प्रकरणामध्ये कायदेशीर विवाह झाला नाही, त्यामध्ये ‘पितृत्व‘ सहजासहजी स्वीकारले जात नाही. ते सिद्ध करावे लागते. अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या मुलाचे वडील त्याच्या जबाबदारीतून हात झटकू शकत नाही. अशा मुलांच्या अधिकारांचे संरक्षण करायला हवे. परंतु, विवाह न करता झालेल्या मुलाला कोणत्याही प्रकारची कायदेशीर मान्यता मिळत नाही, असे न्या भाटकर यांनी म्हटले. विवाहाची व्याख्या कायद्यात करण्यात आलेली नाही. त्यामुळे परंपरेनुसार किंवा कायदेशीर बाबींची पूर्तता करूनच नात्याला‘विवाहा’ चे लेबल लावावे लागते. ‘एका रात्रीचे संबंध किंवा एखाद्या पुरुष आणि महिलेने संमतीने एकमेकांशी ठेवलेले शारिरीक संबंध म्हणजे विवाह नाही,’ असेही न्या. भाटकर यांनी स्पष्ट केले.
इच्छा असली पाहिजे
‘शारिरीक संबंध असणे, हे विवाहातील मुख्य बाब असली तरी ते म्हणजे सर्व नाही. त्यापेक्षा अधिक विवाहासाठी आवश्यक आहे. नात्याला ‘विवाहा’ चे नाव देण्यासाठी दोन्ही पक्षांना एकमेकांशी विवाह करण्याची आणि एकमेकांना ‘पती’ व ‘पत्नी’ चा दर्जा देण्याची इच्छा असली पाहिजे. याचे प्रकटीकरण काही पारंपारिक किंवा कायदेशीर औपचारिकता पूर्ण केल्यावरच होते,’ असेही न्या. भाटकर यांनी म्हटले.