जुन्या नोटांप्रकरणी एक जण ताब्यात
By admin | Published: February 8, 2017 05:15 AM2017-02-08T05:15:49+5:302017-02-08T05:15:49+5:30
चलनातून रद्द झालेल्या पाचशे आणि एक हजारांच्या जुन्या नोटा बदली करण्याकरिता आलेल्या मुंबईतील सुनील रामकरण यादव याला ठाणे पोलिसांच्या वागळे
ठाणे : चलनातून रद्द झालेल्या पाचशे आणि एक हजारांच्या जुन्या नोटा बदली करण्याकरिता आलेल्या मुंबईतील सुनील रामकरण यादव याला ठाणे पोलिसांच्या वागळे इस्टेट गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने सोमवारी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सुमारे ३० लाखांच्या नोटा हस्तगत केल्या असून त्याने या नोटा दोन प्लास्टीक पिशव्यांमध्ये आणल्या होता. तसेच आयकर विभागामार्फत त्याची चौकशी सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
वागळे इस्टेट युनीटचे पोलीस उपनिरीक्षक शिवराज बेंद्रे तसेच पोलीस नाईक दिलीप शिंदे यांना तीन हातनाका, इंटरनिटी मॉल समोरील बस थांब्याजवळ एक जण जुन्या नोटा बदलण्याकरिता येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, युनीटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बल्लाळ यांच्या पथकाने सापळा रचून यादव याला ताब्यात घेतले. २७ वर्षीय यादव हा सांताक्रुज येथील रहिवाशी असून तो एका बिल्डरचा अंकाऊंटट आहे. जुन्या नोटांच्या बदली करुन नवीन नोटा घेण्यासाठी तो आला होता.
या झालेल्या व्यवहारातून त्याला दीड टक्के मोबदला मिळणार होता. त्याला या नोटा माने नामक व्यक्तीने बदली करण्यासाठी दिल्या होत्या. त्यानुसार तो ठाण्यात बसने दोन प्लास्टिक पिशव्यांमध्ये २९ लाख ९७ हजार ५०० रुपये घेवून आला होता. या कारवाई नंतर पुढील तपास आयकर विभागामार्फत सुरु असल्याची माहिती वागळे इस्टेट गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)