प्रजासत्ताकदिनी धुडगूस घालणारे सत्ताधाऱ्यांपैकीच, शरद पवारांचा केंद्र सरकारवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2021 02:19 AM2021-02-14T02:19:47+5:302021-02-14T06:38:41+5:30
Sharad Pawar : दिल्लीच्या सीमेवर पंजाब आणि उत्तर प्रदेशसह काही राज्यांतील शेतकरी आंदोलन करत आहेत. मालाला योग्य भाव मिळावा, अशी त्यांची मागणी आहे.
सोलापूर : केंद्राच्या तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या वेशीवर शेतकऱ्यांनी प्रजासत्ताकदिनी ट्रॅक्टर रॅली काढली होती. यावेळी काही उपद्रवी लोकांनी लाल किल्ल्यावर धुडगूस घातला होता. प्रजासत्ताकदिनी लाल किल्ल्यावर धुडगूस घालणारे ते शेतकरी नव्हते, तर ते सत्ताधाऱ्यांपैकीच होते, असा दावा करत गहू, तांदूळ हमी भावाने घेण्याची जबाबदारी सरकारने घेतली तर अडीच महिने आंदोलन करीत असलेले शेतकरी घरी जातील, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे केले.
पवार म्हणाले, केंद्र सरकार केवळ आश्वासने देते, प्रत्यक्षात काहीच करत नाही. दिल्लीच्या सीमेवर पंजाब आणि उत्तर प्रदेशसह काही राज्यांतील शेतकरी आंदोलन करत आहेत. मालाला योग्य भाव मिळावा, अशी त्यांची मागणी आहे. मात्र, केंद्र सरकार केवळ आश्वासनेच देत आहे.
फसवणूक करणाऱ्या कंपन्यांची यादी शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या ८० कंपन्यांची यादी माझ्याकडे आली आहे. अशा कंपन्यांना धडा शिकविला पाहिजे, असे सांगतानाच निर्यातीसाठी शेतकऱ्यांनी युरोप बाजारपेठेवर लक्ष केंद्रित करावे, अशी अपेक्षाही पवार यांनी व्यक्त केली.
अहिल्यादेवींच्या पुतळ्याचे लोकार्पण
जेजुरी (पुणे) : मार्तंडदेव संस्थानच्या वतीने जेजुरीगडावर पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा १२ फूट उंचीचा पुतळा उभारण्यात आला आहे. गड पायथ्यालगतच्या आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण केले आहे. त्यांचे लोकार्पण शनिवारी शरद पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आले.