एकतर्फी प्रेमातून झाडली गोळी

By admin | Published: October 19, 2014 01:01 AM2014-10-19T01:01:59+5:302014-10-19T01:01:59+5:30

मुलगी देण्यास नकार देऊन, मुलीला मागणी घालणाऱ्याचा चारचौघात पाणउतारा केल्यामुळे आरोपी तरुणाने मुलीच्या आईवर गोळी झाडली. आज सकाळी ८ च्या सुमारास सिरसपेठ (इमामवाडा) परिसरात ही थरारक घटना घडली.

One-shot love shoot shot | एकतर्फी प्रेमातून झाडली गोळी

एकतर्फी प्रेमातून झाडली गोळी

Next

महिला गंभीर - आरोपी फरार
नागपूर : मुलगी देण्यास नकार देऊन, मुलीला मागणी घालणाऱ्याचा चारचौघात पाणउतारा केल्यामुळे आरोपी तरुणाने मुलीच्या आईवर गोळी झाडली. आज सकाळी ८ च्या सुमारास सिरसपेठ (इमामवाडा) परिसरात ही थरारक घटना घडली. या गोळीबारात जखमी झालेल्या महिलेचे नाव गीता सुखदेवराव डोंगरे (वय ४५) आहे. त्या सिरसपेठमध्ये राहतात. तिचे पती टेम्पो चालवतात.
आरोपीचे नाव प्रभाकर पंडित (वय २८) आहे. तो खरबीत राहतो. तो टाईल्स फिटिंगचे काम करतो. गीता डोंगरे यांचा पुतण्या नरेंद्र पाटील हा आरोपी प्रभाकरसोबत काम करतो. सहा महिन्यांपूर्वी नरेंद्रच्या ओळखीतून गीता यांनी आपल्या घरी टाईल्स फिटिंगचे काम प्रभाकरला दिले होते. तेव्हापासून तो अधूनमधून गीता यांच्या घरी यायचा.
गीता यांच्या मुलीशी त्याची मैत्री झाली. तो तिच्या प्रेमात पडला. तिच्याशी लग्न करण्यासाठी तो प्रयत्नरत होता. त्याने यापूर्वी एकदा गीता यांना त्यांच्या मुलीची मागणी घातली होती. गीता यांनी त्याची प्रेमाने समजूत काढून त्याला नकार दिला होता.
आरोपी प्रभाकर तेव्हापासून जास्तच आक्रमक झाला. तो गीता यांच्या मुलीला वारंवार संपर्क करायचा. आज सकाळी ८ च्या सुमारास प्रभाकर गीता यांच्या घरी पोहोचला. त्याने पुन्हा लग्नाची गोष्ट काढून मुलीची मागणी घातली. गीता यांनी ती धुडकावून लावतानाच आरोपी प्रभाकरची खरडपट्टीही काढली. शेजाऱ्यांसमोर झालेला पाणउतारा सहन न झाल्यामुळे आरोपी प्रभाकरने जवळ लपवून ठेवलेला देशीकट्टा काढला आणि गीता यांच्यावर गोळी झाडली. गोळी खांदा आणि मानेच्या मधल्या भागात लागली. त्यामुळे त्या गंभीर जखमी झाल्या. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेनंतर आरोपी पळून गेला.
गंभीर जखमी झालेल्या गीता यांना मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली. माहिती कळताच इमामवाडा पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी नरेंद्र पाटीलच्या माध्यमातून आरोपीच्या घराचा पत्ता शोधला, मात्र तो घरी आढळला नाही. गीता यांच्या बयानावरून इमामवाडा पोलिसांनी कलम ३०७ भादंवि तसेच ३/२५ हत्यार कायद्यानुसार आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला. (प्रतिनिधी)
आरोपी बिहारकडे पळाला ?
आरोपी प्रभाकर पंडित हा मूळचा बिहारमधील रहिवासी आहे. गीता यांच्यावर गोळी झाडल्यानंतर तो मोटरसायकलने रेल्वेस्थानकाकडे पळून गेला. तो बिहारकडे पळाला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. तो बिहारमधूनच आलेल्या काही सहकाऱ्यांच्या आश्रयाला असावा, असाही अंदाज आहे. त्यामुळे नागपूरसह बिहारी कारागिरांच्या ठिकठिकाणच्या राहुट्यांवरही त्याचा शोध घेतला जात आहे.

Web Title: One-shot love shoot shot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.