वन रुपी क्लिनिकचे ‘शटरडाउन’, रेल्वे स्थानकांवरील सेवा होणार बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2017 04:10 AM2017-09-04T04:10:26+5:302017-09-04T04:11:43+5:30
सर्वसामान्यांना केवळ एक रुपयात सेवा देणारे ‘वन रुपी क्लिनिक’चे शटरडाउन होणार आहे. रेल्वे प्रशासनाचा अंतर्गत वाद आणि राजकीय हस्तक्षेपाचा परिणाम क्लिनिकच्या सेवेवर होत असल्याने
स्नेहा मोरे
मुंबई : सर्वसामान्यांना केवळ एक रुपयात सेवा देणारे ‘वन रुपी क्लिनिक’चे शटरडाउन होणार आहे. रेल्वे प्रशासनाचा अंतर्गत वाद आणि राजकीय हस्तक्षेपाचा परिणाम क्लिनिकच्या सेवेवर होत असल्याने सर्व रेल्वे स्थानकांवरील ‘वन रुपी क्लिनिक’ची सेवा येत्या दोन दिवसांत बंद करण्यात येणार आहे. मात्र या क्लिनिकची सेवा शहर-उपनगरातील झोपडपट्ट्यांमध्ये लवकरच सुरू होणार आहे.
रेल्वे प्रशासनाच्या अंतर्गत वादामुळे यापूर्वी दादर येथील ‘वन रुपी क्लिनिक’ तोडण्यात आले होते. त्यानंतर काही काळानंतर ही सेवा पूर्ववत करण्यात आली. मात्र बºयाच ठिकाणी वारंवार रेल्वेच्या अंतर्गत वाद आणि राजकीय हस्तक्षेपाचा अनुभव आल्याने रेल्वे मार्गांवरील ‘वन रुपी क्लिनिक’ची सेवा थेट बंद करण्याचा निर्णय क्लिनिकचे प्रमुख आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राहुल घुले यांनी घेतला आहे.
मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक यांना तक्रारीचे पत्र लिहून हा निर्णय त्यांनी रेल्वे प्रशासनाला कळविला आहे. या पत्रात रेल्वे अधिकाºयांच्या वादामुळे दादर येथील क्लिनिकच्या फार्मसीमध्ये जून महिन्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे म्हटले आहे. त्याचप्रमाणे, अंबरनाथ येथील क्लिनिकच्या जागेबाबत राजकीय हस्तक्षेप केल्याने वाद उद्भवला आहे. नव्याने ११ स्थानकांवर सुरू होणाºया क्लिनिकसाठी ११ लाखांचा निधी जमा करण्यात आला होता. परंतु, काही बड्या राजकीय नेत्यांमुळे रेल्वे प्रशासन बºयाचदा या क्लिनिकच्या जागा बदलत असल्याचे निदर्शनास आल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. सामान्यांच्या सेवेसाठी सुरू केलेल्या या उपक्रमाचा लवकरच विस्तार होणार असून झोपडपट्ट्यांप्रमाणेच घरपोच आरोग्यसेवा सुरू होणार आहे. यात क्लिनिक्सच्या माध्यमातून घराघरांत जाऊन सामान्यांना ही सेवा पुरविण्यात येणार आहे.
सेवेवरील परिणाम टाळण्यासाठी निर्णय
रेल्वे प्रशासनाच्या वाद आणि राजकीय हस्तक्षेपामुळे ‘वन रुपी क्लिनिक’च्या सेवेवर त्याचा परिणाम होत आहे. यामुळे सेवेत खंड पडू नये किंवा क्लिनिकचे नुकसान होऊ नये या विचारातून रेल्वे मार्गांवरील क्लिनिक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आतापर्यंत या सर्व क्लिनिक्समध्ये २० हजार रुग्णांची नोंद करण्यात आली, तर अपघात आणि आपत्कालीन परिस्थितीत २०० रुग्णांवर उपचार करण्यात आले, असे वन रुपी क्लिनिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी व प्रमुख डॉ. राहुल घुले यांनी सांगितले.