समर्थ पॅनलचा एकतर्फी विजय
By admin | Published: April 28, 2016 01:42 AM2016-04-28T01:42:51+5:302016-04-28T01:42:51+5:30
पुणे यांच्या ‘समर्थ पॅनल’ने अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत सत्तांतर घडवत एकतर्फी विजय मिळवला.
कोल्हापूर : कोल्हापूरच्या चित्रनगरीला ऊर्जितावस्था देण्याची ग्वाही देत, नवीन चेहरे घेऊन निवडणुकीत उतरलेल्या मेघराज राजेभोसले, पुणे यांच्या ‘समर्थ पॅनल’ने अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत सत्तांतर घडवत एकतर्फी विजय मिळवला. मंगळवारी १४ पैकी जाहीर झालेल्या १३ पैकी १२ जागा जिंकल्या होत्या. माजी अध्यक्ष विजय कोंडके, प्रसाद सुर्वे, विद्यमान संचालक मिलिंद अष्टेकर यांचा धक्कादायक पराभव झाला.
राम गणेश गडकरी सभागृहात मंगळवारी सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी सुरू झाली. निवडणुकीतील पहिल्या टप्प्यातील निकाल तब्बल बारा तासानंतर जाहीर झाला. त्यामध्ये अभिनेत्री निवेदिता जोशी-सराफ यांच्यासह विद्यमान संचालक मिलिंद अष्टेकर, अनिल निकम, बाळकृष्ण बारामती यांना पराभवाचा धक्का बसला. संथगतीने झालेल्या मतमोजणीबद्दल उमेदवार, त्यांच्या प्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केली.
मतमोजणीचा एकूण कल पाहता व राजेभोसले यांच्या उमेदवारांना मिळालेली मते पाहता त्यांच्या पॅनलने बहुमताकडे वाटचाल सुरु असल्याचे चित्र दिसत होते. महामंडळाच्या सन २०१६-२० या पंचवार्षिक निवडणुकीच्या १४ जागांसाठी क्रियाशील पॅनेल, शक्ती, समर्थ, कोंडके, फाळके, शाहू, संघर्ष, माय मराठी आणि परिवर्तन अशा नऊ पॅनल आणि अपक्षांसह १२० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. महामंडळाच्या इतिहासात यावेळी पहिल्यांदाच सर्वाधिक पॅनेल आणि सर्वाधिक उमेदवारांनी निवडणूक लढविली. निवडणुकीत रविवारी (दि. २४) दोन हजार १३५ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण ५४.६४ टक्के मतदान झाले. कोल्हापूर, पुणे आणि मुंबई केंद्रांवरील मतपत्रिकांच्या एकत्रिकरणानंतर दुपारी बारा वाजता गटनिहाय चौदा टेबलांवर मतपत्रिकांची विभागणी करण्यात आली. दुपारी चार वाजता पहिल्या टप्प्यात रंगभूषा, ध्वनिरेखक, अभिनेत्री, निर्मिती व्यवस्था व व्यवस्थापकीय यंत्रणा, कामगार या पाच विभागांतील मतमोजणीला प्रत्यक्षात सुरुवात झाली. रात्री साडेआठ वाजता संबंधित प्रक्रिया पूर्ण झाली. त्यांना विजय पाटकर यांच्या क्रियाशील पॅनलच्या उमेदवारांनी चांगली लढत दिली. या पाच विभागांत एकूण ६५९ मते बाद झाली. पहिल्या टप्प्यातील निकालात पाच जागांवर बाजी मारल्यानंतर समर्थ पॅनलच्या समर्थकांनी मेघराज राजेभोसले आणि विजयी उमेदवारांसह मतमोजणी केंद्राबाहेर जल्लोष केला. (प्रतिनिधी)